एक युग संपले... एक निष्ठावंत नेता आज अनंतात विलीन झाला. निष्ठा, त्याग आणि जनसेवेचे चालते-बोलते विद्यापीठ आज हरपले. भोर-राजगडच्या मातीतील एक असामान्य व्यक्तिमत्त्व, जनतेचा आधारवड आणि विकासाचा ध्यास घेतलेला लोकनेता आदरणीय अनंतराव थोपटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण, कृषी, दुग्धविकास आणि ग्रामीण विकास क्षेत्राला नवे वळण देणाऱ्या थोपटे साहेबांचे कार्य अतुलनीय आहे. विद्यार्थी दशेत राष्ट्रसेवादलातील कार्यकर्ते, कुस्तीपटू, सहकार खात्यातील अधिकारी, गटविकास अधिकारी, प्रभावी आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास होता.
सन १९७२ मध्ये भोर-वेल्ह्यातील जनतेच्या आग्रहाखातर त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि विजयी झाले. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामासाहेब मोहोळ, आण्णासाहेब मगर आणि शंकरराव पाटील यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाशी निष्ठा जोडली आणि ती अखेरच्या श्वासापर्यंत जपली.
१९८० मध्ये ते पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आले. बाबासाहेब भोसले आणि नंतर वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. दुग्धविकास, पशुसंवर्धन, पुनर्वसन, रोजगार हमी, परिवहन आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये त्यांनी दूरगामी निर्णय घेतले.
"दुधाचा महापूर" योजनेद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग त्यांनी खुला केला. महानंद डेअरीच्या बळकटीकरणात तसेच दूध वाहतुकीसाठी टँकर पद्धतीचा अवलंब करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पुनर्वसन कायद्याच्या निर्मितीतही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
१९९० ते १९९२ या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी ग्रामीण, डोंगरी आणि आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणले. शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी स्थानिक दहावी उत्तीर्ण युवकांना तात्पुरते शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा आणि त्यांच्यासाठी डी.एड. शिक्षणात राखीव संधी उपलब्ध करून देण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयामुळे दुर्गम भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीही मिळाल्या.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकास घडवून आणण्याचा त्यांचा ध्यास होता. कुक्कुटपालन, दुग्धविकास आणि कृषी-आधारित उद्योगांना चालना देत त्यांनी सहकाराची ताकद जनतेपर्यंत पोहोचवली. १९९०-९१ मध्ये स्थापन झालेला राजगड सहकारी साखर कारखाना हे त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे. ऊस उत्पादन वाढावे यासाठी त्यांनी स्वतः शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तब्बल ३० वर्षांच्या आमदारकीत आणि सलग १३ वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या-ज्या खात्यांची जबाबदारी सांभाळली, त्या-त्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या नेतृत्वाखाली भोर, वेल्हा आणि मुळशी परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली.
१९९९ मधील अनपेक्षित पराभवानंतरही त्यांनी सार्वजनिक जीवनापासून अलिप्तता स्वीकारली नाही. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी निष्ठेने काम केले. २००४ मध्ये ते पुन्हा विधानसभेत निवडून आले. त्यानंतर त्यांचा राजकीय वारसा संग्रामदादा थोपटे यांनी समर्थपणे पुढे चालविला.
थोपटे साहेबांचे संपूर्ण आयुष्य हे जनतेसाठी झटणाऱ्या एका समर्पित लोकनेत्याचे प्रेरणादायी चरित्र आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, केलेले संघर्ष आणि जपलेली निष्ठा यामुळेच भोर-वेल्हा-मुळशीच्या जनतेने त्यांच्यावर अपार प्रेम केले.
आज मावळ्यांचा सरनौबत, जनतेचा आधारवड आणि विकासाचा ध्यास घेतलेला एक महान नेता आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. मात्र त्यांच्या कार्याचा सुगंध आणि विचारांची प्रेरणा कायम समाजाला दिशा देत राहील.
मावळ्यांचा सरनोबत, जनतेचा आधारवड, आदरणीय अनंतराव थोपटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
॥ ॐ शांती ॥

