(मुख्य संपादक):- भोर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा भोर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
उसळलेल्या जनसमुदायासमोर उभे राहताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोरच्या विकासाचा ठरलेला मार्ग, आगामी पाच वर्षांची दिशा आणि जनतेच्या अपेक्षांना उत्तर देणारी ठोस हमी भोर शहर विकासाचे शहर याचा थेट उल्लेख केला.
या सभेला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, स्नेहल दगडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शेखर वढणे, संतोष धावले, रवींद्र कंक, सरचिटणीस बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, पोपटराव सुके, आनंदराव आंबवले, विश्वास ननावरे, नागेंद्र चौबे, अतुल किंद्रे, स्वरूपाताई थोपटे, महेश टापरे, रोहन बाठे, प्रशांत डिंबले, वैशाली सणस, सुनील जागडे, विठ्ठल आवाळे, नीता इंगुळकर, राजू रेणुसे, शुभम यादव, माऊली पांगारे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोर राजगड मुळशीचे मा. आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संग्राम थोपटे यांनी प्रास्ताविकात स्पष्ट सांगितले की, "भाजप हा 21 पैकी 21 जागा जिंकणारच". भोर शहरात झालेल्या कोटी कोटी रुपयांच्या विकासकामांचा उल्लेख करत मतदारांनी स्वतःवर दाखविलेला विश्वास हेच आपल्या कामाचे बळ असल्याचे सांगितले. पुढे विरोधकांवर कठोर प्रहार करत त्यांनी म्हटले की विरोधक कायम टीकाटिप्पणी करतात; परंतु सत्यस्थिती, प्रशासकीय प्रक्रिया किंवा सहीचा अधिकार काय असतो हे त्यांना अजिबात माहित नाही. "पहिली सही मुख्यमंत्र्यांचीच असते, निर्णयही तेच घेतात" असे त्यांनी सांगितले.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणास सुरुवात करताच वातावरणात जोश संचारला. ते म्हणाले "भोर मतदारसंघाच्या विकासाला अग्रक्रम देण्याचे भक्कम काम संग्राम थोपटेंनी केलेले आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी मला सभेसाठी बोलावले तेव्हा मी त्यांना म्हटले होते- 'संग्राम दादा, सिर्फ तुम ही काफी हो!” देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले- भोरमध्ये एमआयडीसी स्थापन व्हावी, शेतकऱ्यांना पुन्हा सुगीचे दिवस यावेत, आणि तरुणांना पुरेसा रोजगार मिळावा यासाठी संग्राम थोपटेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मी त्यांना विचारले तुम्हाला काय हवय ते मी देतो, तेव्हा संग्राम थोपटे यांनी सांगितले, मला स्वतःसाठी काहीही नको, दोन मोठे प्रश्न मांडले व ते तुम्ही फक्त सोडवा. त्यानंतरच राज्य सरकारने राजगड सहकारी साखर कारखान्यास ४६७ कोटी रुपयांची कर्जहमी देत कारखाना पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच आगामी अधिवेशनात भोर एमआयडीसीसंदर्भात तुम्हास मी बैठकीस बोलावून घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले. "नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपचे निवडून आल्यावर पुढची पाच वर्षे विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. संपूर्ण सरकार संग्राम थोपटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असा शब्द त्यांनी दिला. "भोर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी येत्या काळात कोट्यवधी रुपयाचा निधी देणार आहे, मतदारांनी प्रचंड बहुमताने भाजपा उमेदवारांना विजयी करावे," असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात एक मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष विद्या यादव व महिला पदाधिकारी, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य बोरगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे सभेचे वातावरण अधिक ऊर्जा आणि उत्साहाने भारले. भोर शहरात झालेली ही सभा केवळ राजकीय नव्हे तर परिवर्तनाचा संदेश देणारी ठरली. विकास, निश्चय आणि नेतृत्वाचा महामंत्र देत मुख्यमंत्री फडणवीस आणि संग्राम थोपटे यांनी भोरच्या भविष्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला.

