मुंबई : महाराष्ट्रात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जपत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत कृत्रिम प्लास्टिक फुलांच्या वापरावर बंदी घालावी, यासंदर्भात लक्षवेधी सूचना सादर केली. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या बंदीविषयी विचार करण्याची ग्वाही दिली.
कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून फुल उत्पादक शेतकरी, फुल बाजार समित्या, व्यापारी व डेकोरेशन करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी **मुंबईतील आझाद मैदानात** एकत्र आले. या आंदोलनाचे नेतृत्व **नवविकास युवक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार** यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना दादासाहेब पवार म्हणाले, "*माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षणी फुलांचा उपयोग होतो. त्यामुळे फुलशेती ही एक जीवनाशी निगडित उद्योगश्रेणी आहे.*" त्यांनी **पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट**चा आदर्श सर्व देवस्थानांनी घ्यावा, असेही सांगितले. कारण हा ट्रस्ट **दररोज नैसर्गिक फुलांनी सजावट करतो**, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना रोज रोजगार मिळतो.
सरकारने राज्यातील महत्त्वाच्या **देवस्थान ट्रस्टांची बैठक घेऊन नैसर्गिक फुलांचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण आखावे**, अशी मागणी यावेळी दादासाहेब पवार यांनी केली.
या वेळी पुणे जिल्ह्यातील शेतकरी शिष्टमंडळाने फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांना भेटून नैसर्गिक फुलशेतीतील अडचणी, नुकसान, विक्रीतील असमानता आदी मुद्द्यांवर सविस्तर निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात दादासाहेब पवार,रोहिदास लखीमले, सौ. प्रिया गायकवाड, बळीराम बोईकर, सचिन जगताप, ईशांत वाल्हेकर, भरत सावंत, गोपाळ पवळे**, **भिकाजी भागवत** यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांच्या या संघर्षामुळे राज्य शासन कृत्रिम फुलांवरील बंदीकडे गांभीर्याने पाहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.