मुंबई (प्रतिनिधी ):
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिषदेच्या (MSME) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी अक्षय बोराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 'हर घर रोजगार, हर हात को काम' या महत्त्वाकांक्षी संकल्पाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यासाठी ही जबाबदारी बोराटे यांच्यावर सोपवण्यात आली असून, ही निवड परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनी केली आहे. एमएसएमई ही भारत सरकारच्या अंतर्गत येणारी सर्वोच्च संस्था असून, केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्याकडे या मंत्रालयाचा कार्यभार आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी धोरणे आखणे, प्रशासन करणे, आणि देशभरातील उद्योजकांना दिशा देणे हे या मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही परिषद उद्योगांच्या विकासास चालना देत असताना, शाश्वततेचा विचार करत संपूर्ण भारतात आर्थिक बळकटीसाठी काम करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ‘हर घर रोजगार, हर हात को काम’ या व्यापक उद्देशाने योजनांची रचना केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात योजना प्रभावीपणे पोहचवण्यासाठी आणि एमएसएमई क्षेत्रात नवसंजीवनी देण्यासाठी अक्षय बोराटे यांची निवड करण्यात आली आहे.
अक्षय बोराटे हे पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून ‘निर्मिक कॉर्प प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण या क्षेत्रांत त्यांनी सातत्याने योगदान दिले असून, गावात रोजगार निर्मिती व आत्मनिर्भर खेडी हा त्यांचा प्रमुख उद्देश राहिला आहे.
या निवडीनंतर बोलताना बोराटे म्हणाले, "मी स्वतः ग्रामीण भागातून आलो असल्यामुळे या भागातील तरुणांच्या अडचणी मला चांगल्याप्रकारे माहित आहेत. मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संसाधने, जैवविविधता ग्रामीण भागात उपलब्ध असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास गावातूनच नवे उद्योजक घडू शकतात."
ते पुढे म्हणाले की, "आपण लवकरच राज्यभर दौरे काढून, परिषद बळकट करून योजना खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासकीय योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल."
राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनीही निवडीवेळी विश्वास व्यक्त केला की, बोराटे हे महाराष्ट्रातील बेरोजगारांचा आवाज बनून केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान एमएसएमई क्षेत्रातील दुवा ठरतील आणि तळागाळातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देतील.
अक्षय बोराटे यांची निवड होताच राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.