कापूरहोळ (प्रतिनिधी):विठ्ठल पवार सर●
"स्वप्न पाहणाऱ्यांचीच नव्हे, तर त्यासाठी झटणाऱ्यांचीच स्वप्नं पूर्ण होतात," याचं जिवंत उदाहरण ठरला आहे, देगाव (ता. भोर) येथील तन्मय पांडुरंग यादव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करत महसूल सहाय्यक (Revenue Assistant) पदावर निवड होऊन त्याने संपूर्ण परिसरात आदर्श घालून दिला आहे. 11 जुलै 2025 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि यादव कुटुंबाच्या कष्टांना यशाचा मुकुट लाभला.
तन्मयचा प्रवास हा केवळ अभ्यासाचा नव्हे, तर संघर्ष, संयम आणि सातत्य यांचा मिलाफ आहे. पिता पांडुरंग यादव हे मागील 37 वर्षांपासून पुण्यात रिक्षा चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी असूनही, आपल्या मुलाला अधिकारी बनवण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि त्या दिशेने आयुष्यभर झटत राहिले. आई-वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र एक करून त्याला खंबीर साथ दिली.
तन्मयचे प्राथमिक शिक्षण देगाव जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी विद्यालय ,नसरापूर व आर.आर. कॉलेज, भोर येथे झाले. पुढे पुण्यात जेधे कॉलेज येथे पदवीच शिक्षण पूर्ण केलं. विशेष म्हणजे, तन्मयने कोणताही क्लास लावला नाही. नियमित अभ्यास, सखोल वाचन आणि आत्मशिस्त या बळावरच तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. या यशामुळे देगाव पंचक्रोशीमध्ये आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांकडून तन्मयचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी तन्मय आज प्रेरणास्थान ठरला असून, "परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी निर्धार असेल तर यश नक्कीच गवसते," हे त्याने सिद्ध केले आहे.
📣 तन्मय यादवच्या यशाची काही ठळक वैशिष्ट्ये :
★कोणताही क्लास न लावता स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर यश.
★रिक्षाचालक वडिलांचा मुलगा, पण स्वप्न मात्र मोठं!
★जिल्हा परिषद शाळेपासून सुरू केलेला प्रवास थेट महसूल विभागात अधिकारी पदापर्यंत.
★ संपूर्ण देगाव व परिसरात अभिमानाचे व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.)