पुणे (प्रतिनिधी) – उन्हाळी सुट्टीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी नियोजित करण्यात आलेल्या 30 दिवसांच्या FLN (Foundational Literacy and Numeracy) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत पुणे जिल्हा शिक्षक समितीने प्रश्न उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती आणि शिक्षकांच्या वैयक्तिक नियोजनाचा विचार करता या उपक्रमावर प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी स्पष्ट मागणी समितीने केली आहे.
उन्हाळी सुट्टी ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक विश्रांतीचा काळ असतो. मात्र या कालावधीत शालेय कार्यक्रमाचे आयोजन केल्यास, त्यात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अनुपस्थित राहतात. तसेच अनेक शिक्षक बंधू-भगिनी सुट्टीसाठी मुळगावी गेलेले असतात किंवा पूर्वनियोजित प्रवासात असतात. परिणामी, FLN सारख्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी शक्य होत नाही, असे मत शिक्षक समितीने मांडले.
या पार्श्वभूमीवर, आज पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे उन्हाळी शिबिराच्या अंमलबजावणीत आवश्यक ते लवचिकपणा आणि शाळांच्या परिस्थितीनुसार समायोजन करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देताना समितीचे सरचिटणीस संदीपआप्पा जगताप व कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिक्षकांच्या सुट्ट्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर आधारित निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.
या मागणीमुळे प्रशासनाने लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.