20 वर्षांनंतर विद्यार्थ्यांकडून आठवणींना उजाळा.

Maharashtra varta



न्यूजवार्ता नेटवर्क

कापूरहोळ :विठ्ठल पवार सर●

“शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नसून ती संस्कारांची शिदोरी देणारी जीवनशाळा असते. येथे घडलेले क्षण विसरता येत नाहीत. तुम्ही आमच्यासाठी जेव्हा प्रेम, आदर आणि स्नेह घेऊन परत आलात, तेव्हा आमच्या डोळ्यांत समाधानाश्रू दाटले…” असे भावस्पर्शी उद्गार श्री शिवाजी विद्यालय, नसरापूर येथील इंग्रजी विषयाच्या  निवृत्त शिक्षिका शिंदे मॅडम यांनी व्यक्त केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात करिअरसाठी जातात. शालेय जीवनात एकत्र भेटलेले विद्यार्थी कधी भविष्यकाळात भेटतील याची शाश्वती नसते. नसरापुर ता. भोर येथील श्री शिवाजी विद्यालय ज्युनिअर कॉलेज, नसरापूर येथे 2004-05 साली इयत्ता 10 वी मध्ये शिकलेल्या 75 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 20 वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा साजरा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरुजनांचा सत्कार करून त्यांना तुळशीची रोपटी, सन्मानचिन्ह व स्नेहभेट वस्तू देत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. गुरुजनांचे यथोचित स्वागत करत त्यांना सन्मानित करण्यात आले.

 या कार्यक्रमास शाळेच्या इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिंदे मॅडम, कणसे मॅडम, पुंडलिक खुटवड आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावून गेल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी 2004-05 साली दहावीमध्ये शिकत असलेले माजी विद्यार्थी अजिंक्य हाडके,  गणेश जाधव, मेघा उकिरडे, चव्हाण अमोल यादव ,माधुरी झेंडे, राणी खुटवड, किरण खुटवड,मोहसीन शेख, ऍड. रामदास गुरव, नवनाथ कोंडे, आनंदा सोंडकर, नितेश भूतकर, शोपीक शेख, रेश्मा कामठे-वाल्हेकर, पूनम वाल्हेकर-शेंडकर, अश्विनी राऊत-आंबीके यांच्यासह एकूण 75 विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

20 वर्षांनंतर प्रथमच एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी केक कापून, फनी गेम्स खेळून, जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाचे क्षण साजरे केले. संपूर्ण कार्यक्रमात आनंदाचे आणि भावनेचे वातावरण होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले. त्यांच्या खास शैलीतील कविता, शेरोशायरी, आणि हलक्याफुलक्या विनोदांनी वातावरणात हास्य आणि आनंद निर्माण केला. त्यांनी शाळेबद्दल असणाऱ्या प्रेमाचा उत्कट भाव व्यक्त करत स्नेहमेळाव्याला विशेष उंची दिली.

प्रास्ताविक राणी खुटवड यांनी केले तर आभार प्रदर्शन अजिंक्य हाडके यांनी मानले.


To Top