कापूरहोळ( प्रतिनिधी)
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षातून फारकत घेण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नुकतेच त्यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील कव्हर फोटोमधून काँग्रेसचे चिन्ह बाजूला करत स्वतःचा एक स्वतंत्र फोटो अपलोड केला आहे.
हा बदल हा केवळ एक साधा सोशल मीडिया अपडेट नसून, त्यामागे मोठा राजकीय संदेश लपला असल्याची जोरदार चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, सध्या ते भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करत आहेत.
या घडामोडींमुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, संग्राम थोपटे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लवकरच ते अधिकृत घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.