न्यूज वार्ता( मुख्य संपादक सविस्तर वृत्त :)
भोर राजगड मुळशी तालुक्यातील राजकारणात सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते व भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असून, रविवारी त्यांच्या पक्षप्रवेशाचा थाटात कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येत आहे.अत्यंत महत्त्वाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.
राजकारणात नेत्यांची पक्षांतरं ही काही नवीन बाब नाही, मात्र संग्राम थोपटेंसारख्या मातब्बर मजबूत सामाजिक व राजकीय आधार असलेल्या काँग्रेसचे नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ही बाब निश्चितच चर्चेचा विषय बनली आहे. मागील काही काळापासून त्यांचे भाजपशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चा रंगत होत्या, त्या आता प्रत्यक्षात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
थोपटे घराणं हे भोर, वेल्हा, मुळशी परिसरात दीर्घकाळपासून प्रभावी असून, संग्राम थोपटे यांनी सलग 3 वेळा आमदारकीच्या काळात विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाची गणितं बदलणार हे निश्चित मानलं जात आहे.
27 एप्रिल 2025 रोजी रविवारी भाजपमध्ये त्यांच्या जंगी स्वागतासह प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे. या कार्यक्रमास भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या घडामोडीमुळे भोर तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होणार असून, आगामी काळात या प्रवेशाचे पडसाद जिल्हा व राज्यस्तरावरही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.