उंबरे येथे शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळाला.

Maharashtra varta

 उंबरे येथे शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळाला



कामथडी (प्रतिनिधी):-

शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागण्याच्या अनेक घटना पुणे जिल्ह्यात घडल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र वीज वितरण कंपनी अद्यापही कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. उंबरे ता.भोर  येथे शेतजमीन गट नंबर 40  या चार एकर क्षेत्रात ऊस असून, हे ऊस पीक 14 महिन्यांचे झाले होते. सदर उसाचे पिकावरून महावितरणची एलटी लाईनची वायर सिंगल फेज व थ्री फेज गेली आहे. जवळपास या शेतात 11 विद्युत खांब आहेत याचे शॉर्टसर्किट होऊन उसात ठिणगी पडली आणि उसाला आग लागली.  शेतकरी  पंढरीनाथ सर्जेराव खुटवड  व गणेश सर्जेराव खुटवड व कुटुंबातील व्यक्तींनी  आग विझवण्यासाठी शेताकडे गेले. पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उसाला मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे पेटलेला ऊस जळाला आहे. या आगीमुळे दीड एकर ऊस जळून गेला असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उंबरे तलाठी यांनी याबाबत पंचनामा केला आहे.

यासंदर्भात पंढरीनाथ सर्जेराव खुटवड  व गणेश सर्जेराव खुटवड यांनी राजगड  पोलिसांत माहिती दिली आहे. वीज वितरण कंपनीने शेतातील धोकादायक वीजवाहक तारा काढून टाकाव्यात, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

शेत मालाला सुयोग्य बाजारभाव भेटत नाही, अहोरात्र कष्ट करून उभ्या डोळ्यांदेखत  पीक जळून जात असेल तर  शेतकऱ्याचं  हृदय हेलावून गेलं,प्रशासनाने ताबडतोब या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.


To Top