शाळांच्या विकासासाठी ह्युमॅनिटेरियन्स व सेवा सहयोग फाऊंडेशनचा पुढाकार.

Maharashtra varta

 



नसरापूर (प्रतिनिधी):
भोर तालुक्यातील शाळांच्या विकासासाठी ह्युमॅनिटेरियन्स व सेवा सहयोग फाऊंडेशन आणि रचना संस्थेच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. आपटी व किकवी येथील शाळांसाठी आधुनिक स्वच्छता गृह बांधण्याबरोबरच, शिवरे प्राथमिक शाळेसाठी मुलांना पावसाळ्यात चिखलातून जावे लागू नये म्हणून पेव्हिंग ब्लॉकचा पादचारी मार्ग तयार करण्यात आला आहे.

शिवरे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक प्रशांत डिंबळे, सुनील लेकावळे आणि सर्व शिक्षक वर्गाच्या उपस्थितीत या सुविधा प्रदान करण्यात आल्या. किकवीच्या छत्रपती शिवाजी विद्यालय आणि आपटी प्राथमिक शाळेतील मुलांसाठी मंजू जोशी, माधव जोशी, टी.के. गायकवाड आणि शोभा गायकवाड यांच्या हस्ते स्वच्छता गृहांचे उद्घाटन झाले.

किकवी येथील कार्यक्रमात सरपंच नवनाथ कदम, उपसरपंच वंदना अहिरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत, स्वप्नील पांगारे, रचना संस्थेच्या माधुरी उंबरकर आणि मयुरी पवळे तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य सहभागी झाले. आपटी येथील कार्यक्रमात सरपंच शंकर पारठे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश साळेकर, मुख्याध्यापिका सुरेखा चिकणे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

भोर तालुक्यात ह्युमॅनिटेरियन्सच्या पुढाकाराने आतापर्यंत ११ शाळांना स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्यात आले असून, तालुक्यातील दुर्गम भागातील गरजू शाळांना अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे माधव जोशी यांनी सांगितले.

हा उपक्रम शाळांच्या मुलांना आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.

To Top