भोर :मुख्य संपादक न्यूज वार्ता●
भोर विधानसभेत काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना जोरदार धक्का बसलाय. भोरचे काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य सतीश चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. सतीश चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भोर विधानसभेत काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
विद्यमान आमदारांची एकाधिकारशाही, मनमानी कारभार व तालुक्याचा रखडलेला विकास यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे भोर राजगड या दोन तालुक्यात महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांचे पारडे जड होणार आहे. सलग पंधरा वर्षे मतदार संघातील सत्ता हातात ठेवताना विद्यमान आमदार पक्षातील इतर सहकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याने, त्यांच्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या नाराजीला वाट करून देत चव्हाण यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय.
भोर काँग्रेसमध्ये थोपटे यांच्या कार्यशैलीबद्दल प्रचंड खदखद आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोर मध्ये होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत काँग्रेस मधील कार्यकर्त्यांचा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भोर विधानसभेत परिवर्तन नक्की होणार, असे महायुतीचे पदाधिकारी सांगत आहेत.