भोर : उद्या होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता 203 भोर विधानसभा मतदार संघामधील 564 मतदान केंद्रांकरिता मतदान साहित्य वाटप करण्यात आले आहे. संबंधित कर्मचारी मतदान केंद्रावरती हजर झाले असून उद्याच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयारीनिशी सज्ज करण्यात आले असल्याची माहिती भोर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विकास खरात यांनी दिली आहे.
यामध्ये सीलबंद ईव्हीएम कंट्रोल युनिट, दोन सीलबंद ईव्हीएम बॅलेट युनिट, सीलबंद व्हीव्हीपॅट, मतदान केंद्रावर वापरले जाणारे शाई या वस्तूंचा समावेश आहे.
यासाठी आयटीआय भोर, पंचायत समिती वेल्हे, जिल्हा परिषद शाळा कुरण खुर्द पानशेत व राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली मुळशी या 4 ठिकाणी मंडप व्यवस्था करून टेबल लावण्यात आले होते.
निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता, पोलीस कर्मचाऱ्यांकरिता भोजन व्यवस्था ही करण्यात आली होती. मतदान साहित्य आपापल्या मतदान केंद्रावर घेऊन जाण्याकरिता 90 बसेस व 71 जीप 9 मिनीबस अशा एकूण 170 वाहनांची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली होती.
यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक भोर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विकास खरात, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन ,सर्व समन्वय अधिकारी सर्व क्षेत्रीय अधिकारी व पोलीस कर्मचारी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणा दरम्यान दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करावे व आपले कर्तव्य निष्पक्षपणे, कुणाच्याही दबावत न येता पार पाडावे, तसेच मतदारांनी उद्या दिनांक 20 रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आव्हान भोर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विकास खरात यांनी केले आहे.