वै. रामनाना कोकाटे यांचा जीवन प्रवास.
राजगड( प्रतिनिधी):-विठ्ठल पवार सर.
छत्रपती शिवरायांना वंदनीय राजगड तालुक्यातील भट्टी येथील सरनौबत कोकाटे घराण्याचे वारसदार, तोरणागडाचे तपस्वी शिलेदार व पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती वै. रामनाना उर्फ रामचंद्र दगडोबा कोकाटे यांनी दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केले. त्यांचा प्रथम स्मृतिदिन २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
रामनाना यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी भट्टी येथे झाला. आई हारूबाई आणि वडील दगडोबा विठ्ठलराव कोकाटे यांच्या संस्कारात त्यांची जडणघडण झाली. प्राथमिक शिक्षण भट्टीत आणि माध्यमिक शिक्षण पुण्यातील राजा धनराज हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. वडील दगडोबा पुणे-वेल्हे खासगी वाहतूक व्यवस्थेत कार्यरत होते, मात्र १२ वर्षांच्या वयात रामनानांवर कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली.
कुटुंबाच्या कष्टात भागीदारी करताना, त्यांनी १७ व्या वर्षी भट्टीपासून वेल्हेपर्यंत पायपीट करत दूध विक्री करण्यास प्रारंभ केला. चार वर्षे त्यांनी कष्टाची कामे केली, नंतर वेल्हे येथील खादी ग्रामोद्योग भांडारात आणि पुणे येथे पीएमटीमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. १९६९ मध्ये, न्हावी ता. भोर येथील सुमनताईंसोबत विवाह झाला. त्यांची जिद्द आणि चिकाटी लक्षात घेऊन त्यांचे मामा वै. नारायणराव महादेव सोनवणे यांनी स्वतःचा वाहतूक व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य केले.
रामनाना यांनी शेतकऱ्यांना दूध व्यवसायात प्रवेश देणे, वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणे, आणि तोरणा भागात नवीन शाळा सुरू करून अनेक भूमीपुत्रांना शिक्षकाच्या नोकरीची संधी मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला. शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली, ते दत्त दिगंबर दूध वाहतूक संस्थेत सभासद बनले. १९९१ ते २००० या कालावधीत ते संस्थेचे संचालक होते.
रामनाना यांनी गावांमध्ये रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित केली, शिवकालीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला, आणि गरीब लोकांना आर्थिक मदत प्रदान केली. १९९७ मध्ये, ते पुणे जिल्हा परिषदेवर काँग्रेसकडून विक्रमी मतांनी निवडून आले, आणि १९९९ मध्ये कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या, ज्यामुळे जिल्ह्यातील कृषी विकासाला चालना मिळाली.
रामनाना यांचा संघर्ष त्यांच्या ७६ वर्षांच्या आयुष्यात निरंतर चालू होता. त्यांच्या पत्नी सुमनताईंने वारकरी संप्रदायातून आध्यात्मिक वारसा जपला. चिरंजीव जीवन, आदर्श सरपंच सचितानंद, अभियंता मनोहर, व पुतणे गणेश, भाचे लालूअण्णा पासलकर यांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा संकल्प आहे.
वै. रामनाना कोकाटे यांनी माणुसकीचे महत्त्व जपले आणि त्यांचे कार्य आजही त्यांचे चिरंजीव सचितानंद (महाराज) यांच्या माध्यमातून जिवंत आहे. दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या त्यांच्या स्मृतीस अभिवादन.