पेन्शन योजना सह अन्य मागण्यांबाबत शासन अनुकूल,बेमुदत संप मागे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांची माहिती
मुंबई( प्रतिनिधी):-
राज्य सरकारी, निम-सरकारी शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी संघटना समन्वय समिती च्या सुकाणू समितीची सदस्यांसह मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे समवेत सह्याद्री अतिथी गृह, नरिमन पॉईंट मुंबई या ठिकाणी बैठक पार पडली.यावेळी सामान्य प्रशासन, अर्थ, शालेय शिक्षण, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य अशा वेगवेगळ्या विभागाचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.
सदर सभेत १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत आलेल्या राज्यातील कर्मचारी, शिक्षकांना राज्याची सुधारित, केंद्राची UPS आणि प्रचलित NPS या तीन योजनांपैकी कोणतीही योजना स्वीकारण्याचा विकल्प देता येईल आणि भविष्यात कर्मचारी, शिक्षकांना विकल्प कधीही बदलविता येईल. सदर योजना १ सप्टेंबर २०२४ पासून लागू होईल.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात निघाल्या प्रकरणी १९८२ ची पेन्शन योजना जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षकांना लागू करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट पुढे तातडीने सादर करण्याची सूचना मा. मुख्यमंत्री महोदयांनी केली.
पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता सर्वांना पदवीधर वेतनश्रेणी बाबत अर्थ व शिक्षण विभागाने एकत्र बसून तातडीने पुढील कार्यवाही करावी तसेच १०-२०-३० वर्षांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या तसेच निवृत्ती उपदान १४ लाख ऐवजी २५ लाखांपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव कॅबिनेट पुढे ठेवण्याचे निर्देश दिले. संचमान्यता, अशैक्षणिक कामे व अन्य शिक्षक संवर्गातील मागण्यांबाबत शिघ्र सभा घेण्याच्या सूचना मा. शिक्षण सचिवांना दिल्या. शासनाने बहुतांशी मागण्या मान्य करून आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात अनुकूल भूमिका घेतली असल्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले.
या संदर्भाने दि.५ सप्टेंबर रोजी ११.३० वाजता समन्वय समिती घटक संघटनांची आभासी सभा होऊन शासनाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसह इतर मागण्या संदर्भात अनुकूलता दर्शविल्याने बेमुदत संप मागे घेत असल्याची माहिती देऊन घोषणा समन्वय समितीचे निमंत्रक मा. विश्वास काटकर यांनी केली.सदर सभेसाठी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष मा.अशोकजी दगडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्याध्यक्ष विजय कोंबे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष मा. केशवराव जाधव, शिक्षक भारतीचे मा. सुभाष मोरे, कोषाध्यक्ष मा.गणेशजी देशमुख, कार्यालयीन चिटणीस अविनाशजी दौंड, माध्यमिक शिक्षकेतर संघटनांच्या फेडरेशनचे सह कार्यवाह शिवाजी खांडेकर, मध्यवर्ती संघटनेचे संघटक सुबोधजी किर्लोस्कर, प्रसिद्धी प्रमुख सुरेंद्रजी सरपाते यांचेसह राजपत्रित अधिकारी महासंघाचे ग. दि.कुलथे,समिर भटकर यांचेसह नगरपालिका महानगरपालिका, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक, उच्च महाविद्यालयीन शिक्षक, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

