गावाला गावपण ,घराला घरपण व मंदिराला देवपण आणणारे श्रमसंस्कार शिबिर हे लोकहितासाठी उपयुक्त:- सरपंच नवनाथ गायकवाड
ट्रिनिटी अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील करंदी खे.बा.येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर.
नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.
कोंढवा येथील के. जे. शैक्षणिक संकुलाचे ट्रिनिटी अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावात विविध स्वच्छता, सामाजिक प्रबोधन कार्यक्रम, मंदिर स्वच्छता व रंगरंगोटी ,जलसंधारण आदि उपक्रम प्रभावीपणे राबवून गावाला गावपण, घराला घरपण व मंदिराला देवपण आणण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होत असून हे शिबिर लोकहितासाठी उपयुक्त आहे असे प्रतिपादन करंदी खे.बा.चे युवा सरपंच नवनाथ आप्पा गायकवाड यांनी केले.
कोंढवा येथील के. जे. शैक्षणिक संकुलाचे ट्रिनिटी अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर
८ फेब्रुवारी पासून करंदी (खे.बा.) ता. भोर येथे सुरू आहे. या शिबिरांत युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत ग्राम स्वच्छता, व्यसनमुक्ती जनजागृती, चि. साहिल भामे याचे शिवचरित्र,
संदेश मोरे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील परिसरात वर्गाबाहेर प्रांगणात इंग्लिश अल्फाबेट व मराठी बाराखडी पेंट करण्यात आली आहे. १०० सिमेंटची रिकामी गोनी वापरून वाळू व माती भरून वनराई बंधारा देखील बांधण्यात आला. याचा उपयोग चरण्यास येणाऱ्या गुरांना तसेच जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी होणार आहे. याच महाविद्यालयाने २०१६ साली देखील असेच विविध उपक्रम व वनराई बंधारा बांधला होता. तसेच दि. १४ फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच शिबिरांत गावातील पुरातन असे महादेवाचे मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून त्यास रंगरंगोटी करून सुशोबीत करण्याचे काम सुरू आहे. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत औटी तसेच गावचे युवा सरपंच नवनाथ गायकवाड, गणेश गोळे,उपसरपंच प्रयाग गोळे, आदर्श मा. सरपंच सौ. अलकाताई तळेकर, करंदी खे.बा .चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सुप्रियाताई बोरगे, आणि ५० मुलामुलींनी सहभाग नोंदविला असून हे शिबिर यशस्वी होण्याकरिता कार्यक्रम अधिकारी प्रा. जितेश धुळे, सहकार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बडदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

