अनिल वसंत दीक्षित(सारंगनिल)
" काटेरी वाट " आनंददायी प्रवास.
पुणे (प्रतिनिधी)
एका कवीसंमेलनाच्या निमित्ताने कवी लक्ष्मण शिंदे यांची भेट झाली.त्यांनी आत्मियतेने त्यांचा पहिलावहिला " काटेरी वाट " हा काव्यसंग्रह भेट दिला.शिर्षक " काटेरी वाट " असलं तरी यातील अस्सल मातीतल्या कविता वाचणं म्हणजे सुखद अनुभव होता.
सर्वप्रथम कवी लक्ष्मण शिंदे यांचं या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाबद्दल खूप खूप अभिनंदन.
कुठल्याही विषयावर,प्रसंगावर कविता लिहिताना कवी त्या विषयाला,प्रसंगाला सामोरा गेला पाहिजे किंवा त्या अनुभवातून गेला असला पाहिजे असं काही नसतं.त्या विषयाची,प्रसंगाची कल्पना करून कवी ती कविता वास्तवतेच्या पातळीवर आणू शकतो आणि हेच त्या कवीचं खरं कसब असतं.परंतु कवी स्वत: त्या अनुभवातून गेला असेल तर त्या अनुभूतीतून आलेली कविता वाचणा-याच्या काळजाला पटकन भिडते,वाचणा-याच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते.
अशा प्रकारच्या अनेक कविता कवी लक्ष्मण शिंदे यांच्या " काटेरी वाट " या काव्यसंग्रहातून वाचवयास मिळतात.
उदाहरणच द्यायचं झालं तर
रात्रीच्या प्रहरामध्ये
पाणी धान्याला देताना
पाटाच्या पाण्यामध्ये
चंद्र दिसतो खेळताना
किंवा
टोचून काट्याने तळव्याला
शंभर भोकं पायाला
आणखी नवीन कुरपाला
जागाच नव्हती राहायला
मोलमजुरी करणाऱ्या,जेमतेमच शिक्षण घेतलेल्या शेतकरी कुटुंबात लक्ष्मणरावांचा जन्म झाला. लक्ष्मणने खूप शिकून मोठा अधिकारी व्हावं हे त्यांच्या थोरल्या बंधूंचं म्हणजे रामचंद्र यांचं स्वप्न होतं.बळजबरीने शिक्षण घेता घेता लक्ष्मणरावांनी शाळेतील गणितं सोडवली खरी पण पोट आणि भाकरीचं गणित सोडवताना आपल्या कुटुंबाला करावी लागणारी कसरत त्यांनी जवळून अनुभवली.आणि या कष्टाचं चीज झालं पाहिजे या जिद्दीतूनच त्यांनी पदवीत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना वनविभागात नोकरीही मिळाली.
पदवीत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत अभ्यासक्रमातील कवितांव्यतिरिक्त कवितांशी अजिबात संबंध नसणा-या,आणि अभ्यासक्रमातील कविता डोक्यावरचं ओझं वाटणा-या लक्ष्मणरावांचा काव्यप्रवास मोठा मजेदार आहे.लॉकडाऊन मधे रामचंद्र पाचांगणे या मित्राने त्यांना कवितेच्या एका समूहात समाविष्ट केले.त्या समूहातील कविता वाचून लक्ष्मणरावांनीही काही ओळी लिहील्या आणि मित्राच्या सांगण्यावरुन त्या समूहातील स्पर्धेसाठी दिल्या आणि त्यांचा त्या स्पर्धेत तिसरा क्रमांक आला.या प्रसंगानंतर त्यांचा काव्यप्रवास अधिकाधिक बहरत गेला आणि तो " काटेरी वाट " या काव्यसंग्रहाच्या मुक्कामापर्यंत यशस्वीपणे येऊन पोहोचला.
शिक्षणक्षेत्रातील प्रेरणास्थान बंधू रामचंद्र तर काव्यक्षेत्रातील प्रेरणास्थान मित्र रामचंद्र
या दोन रामचंद्रांमुळे लक्ष्मणरावांचा जीवनप्रवास आनंददायी आणि सुखकर झाला असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
या काव्यसंग्रहातील कविता अतिशय साध्या आणि सोप्या आहेत.यात उपमांचा अतिरेक नाही,अलंकारांनी नटवलेल्या नाहीत,कुठल्याही वृत्त,छंदात नाहीत पण त्या ख-या आहेत कारण त्या कवितांमधे कुठलीही कृत्रिमता नाही तर त्यांना मातीचा नैसर्गिक गंध आहे.
या काव्यसंग्रहातील कवितांमधे बालपणातल्या सुखदु:खांच्या
आठवणी आहेत,शेतक-यांच्या वेदना आहेत,कुटुंबातील आपलेपण आहे,प्रेम आहे, विरह आहे,निसर्गातील हिरवाई आहे,पावसाची विविध रुपं आहेत,देशाबद्दलचा अभिमान आहे,विठुरायाची वारी आहे,राजकारणाचं वास्तव चित्रण आहे,भूतकाळातील गरीबीतल्या श्रीमंतपणाची आणि वर्तमानकाळातील श्रीमंतीतल्या गरीबपणाची तुलना आहे,मैत्रीवरील सुंदर ओळी आहेत
जीवनाच्या या वाटेवर
देव कधी भेटला नाही
जे भेटले मित्र चार
देवापेक्षा कमी नाही
मैत्रीवर यापेक्षा सुंदर भाष्य काय असेल ?
शेतकरी किती महत्त्वाचा आहे हे सांगताना लक्ष्मणराव लिहितात
मान ठेवा शेतमालाचा
जगतंय जग शेतीवर
नाहीच पिकली शेती
जग जाईल सरणावर
तसेच लक्ष्मणरावांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणा-या या पुढील ओळीही खूप सुंदर
मी पाहिलंय पानाला
अंकुरापासून पानात रुपांतरीत होताना
फांदीवर लोळताना,फांदीवर खेळताना
मी पाहिलंय पानाला तारुण्यात येताना
अशा प्रकारे अनेकानेक विषयांना स्पर्श करणा-या या कविता वाचताना मनस्वी आनंद होतो.
कारण ही काटेरी वाट तुडवताना लक्ष्मणरावांनी कुठेही दु:खाचं भांडवल केलेलं नाही,कुणाविषयी कसलीही कटूता बाळगलेली नाही,कशाविषयी तक्रारीचा सूर काढलेला नाही.अतिशय सकारात्मक पद्धतीने आपल्या आयुष्याचा प्रवास त्यांनी मांडलेला आहे.
चित्रकार मा.अरविंद शेलार यांचं समर्पक मुखपृष्ठ,पाठ्यपुस्तकातील कवी मा.हनुमंत चांदगुडे यांची पाठराखण करणारी प्रस्तावना,पोलीस मा.बापू तातन कांबळे यांचे शुभेच्छापर दोन शब्द यांनी या " काटेरी वाट " काव्यसंग्रहाचा प्रवास अतिशय सुंदर आणि आशादायक असा झाला आहे.
कवी लक्ष्मण शिंदे यांना पुढील साहित्य प्रवासासाठी फुलाफुलांच्या शुभेच्छा.
अनिल वसंत दीक्षित(सारंगनिल)९९२२६१३३७५
दिनांक : २७/७/२०२२

