सरपंच, ग्रामसेवकाकडून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप. जनहित याचिका दाखल करणार :-सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे.

Maharashtra varta

 सरपंच, ग्रामसेवकाकडून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप.

जनहित याचिका दाखल करणार :-सामाजिक कार्यकर्ते अरुण शिंदे.










पुणे ( प्रतिनिधी): 

खरीव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी शासकीय निधीचा गैरवापर केला  असून त्यांची चौकशी व्हावी, अन्यथा शासकीय कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे खरीव येथील ग्रामपंचायत सदस्य अरुण रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. या संबंधीचे निवेदन त्यांनी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसीन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद वेल्ह्याचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना दिले आहे.


त्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,खरीव येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता  विकासकामाची मागणी करून सिमेंट क्रॉकिटीकरणासाठी आलेला निधी खासगी जागेत वापरला आहे. विकासकामांचे ठराव देखील मासिक सभेत न मांडता परस्पर कोणालाही न

विचार घेता बनविले आहेत. प्रोसेडिंगवर देखील बोगस सह्या घेतल्या गेल्या असून याची देखील चौकशी झाली पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांपैकी चार सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांनी ज्या ठेकेदाराच्या नावे बिल वाटप केले आहे, त्या ठेकेदार अथवा परवानाधारक यांचे या कामांच्या बाबतीत काहीही संबंध नसताना त्यांच्या नावावर बिल काढले आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून ग्रामपंचायत इमारतीसाठी पंधरा लाख मंजूर झाले असून, या इमारतीचे बांधकामदेखील बेकायदेशीर जागेत सुरू आहे. गट नं. २४१ यामधील बक्षीसपत्रदेखील बोगस आहे. उपविभागीय अधिकारी भोर यांच्याकडे यासंदर्भात खटला सुरू असून, कधीही बक्षीसपत्र रद्द होण्याची चिन्हे आहेत. या ठिकाणी देखील निधीचा गैरवापर होत आहे.


शासनाने या  पैशांबाबतची  रिकवरी करणे गरजेचे आहे.शासकीय अधिकाऱ्यांची देखील चौकशी या प्रकरणात होणे महत्त्वाचे आहे. याबाबत मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत, आम्ही न्याय मागणार आहोत, असे सामाजिक युवा कार्यकर्ते अरुण रामचंद्र शिंदे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

To Top