भोरचा स्वानंदी शिक्षण हा उपक्रम विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी उपयुक्त आहे: डॉ. शोभा खंदारे.
देगाव (ता. 15. )
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाची मुख्यालयाबाहेर आयोजित केलेली पहिलीच मासिक सभा नुकतीच भोर तालुक्यातील देगाव येथे संपन्न झाली. यात दहा कलमी कार्यक्रम व इतर उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे म्हणाल्या की, "कोरोना लॉकडाऊन काळात भोर तालुक्यात गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी स्वानंदी शिक्षण हा अभ्यासक्रम तयार केला, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दर्जेदार व्हिडीओ तयार केले, तसेच जेथे ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध नाही अशा ठिकाणी कृतिपत्रीकेच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. आता कोरोनाचे संकट ओसरू लागल्यानंतर विद्यार्थी नुकतेच शाळेत येत आहेत, त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी व त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वानंदी शिक्षण हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. तसेच विद्यार्थ्यांची सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून सुरू करण्यात आलेला दहा कलमी कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे भोर तालुक्यात सुरू आहे."
यावेळी गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांना 'नॅशनल अवार्ड फॉर इनोवेशन ऍन्ड गूड प्रॅक्टिसेस इन एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा गुणवत्ता कक्ष व देगाव ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या सभेत देगाव शाळेत आयडिया फाऊंडेशन यांच्या सहकार्याने कश्मिरा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी जर्मन भाषा शिकत आहे त्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेतून पाहुण्यांचे स्वागत करून जर्मन व इंग्रजी भाषेतून पाहुण्यांसोबत संवाद साधला. देगावचे ग्रामस्थ नाना गायकवाड व आबासाहेब यादव यांनी गावकीच्या शिक्षण फंडाबाबत माहिती दिली. देगाव ग्रामस्थांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात वार्षिक 50 पैसे गोळा करून गावकीचा फंड सुरू केला, या फंडाच्या पैशातून गावात शाळा बांधली, शाळेला वेळोवेळी मदतीसोबतच गावातील अनेक विकासकामे केली. 1971च्या युद्धात देशाला मदत, कोरोना फंडाला मदत असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले अशी माहिती दिली. सर्व उपस्थितांनी देगाव ग्रामस्थांच्या शिक्षण फंडाचे कौतुक केले.
जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या टिमने कामथडी शाळेस अचानक भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, दहा कलमी कार्यक्रमाची सद्यस्थिती व अभिलेखे याची तपासणी केली, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, शाळेच्या गुणवत्तेबद्दल कौतुक केले.
सदर सभेसाठी डॉ. शोभा खंदारे, प्रणिता कुमावत, माणिक बांगर, एन.पी.शेंडकर, प्रभाकर क्षीरसागर, सुवर्णा तोरणे, कृष्णा फडतरे, तसेच सर्व तालुक्यातून आलेले विस्ताराधिकारी संजय रुईकर, ज.रा. सोनवणे, केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे- कदम अंजना वाडकर नाद जगताप उपस्थित होते. सरपंच शिवाजी यादव, मंजुषा शेलार, सुलोचना पवार, अश्विनी सावंत, अंकुश सावंत, सुशील शेलार,महेंद्र सावंत, संगीता बोरगे, मीनाक्षी ढमाले, संध्या पारगावकर, माधुरी सपारे, संध्या राऊत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सभेचे सूत्रसंचालन सुरेश सुतार यांनी केले, तर आभार केंद्रप्रमुख ना.द. जगताप यांनी मानले.
