संत सेवालाल महाराज यांचे मानवतावादी विचार.

Maharashtra varta

 संत सेवालाल महाराज यांचे मानवतावादी विचार.


नगर (प्रतिनिधी)

  संतांची भूमी म्हणून आपल्या भारतभूमीस गौरवले जाते. या भारतभूमीत अनेक संत महात्मे होऊन गेले. या संत महात्म्यांनी आपल्या आचरणातून आणि शिकवणीतून समाजाला विविध संदेश दिले. संत शिरोमणी सेवालाल महाराज हे गोरबंजारा समाजाचे आराध्य दैवत समजले जातात. त्यांनी डोंगर-दऱ्या मध्ये राहणाऱ्या गोरबंजारा समाजाला तसेच समाजातील सर्वच लोकांना त्यांच्या लोकगीतातून प्रबोधन केले. गावोगावी तसेच डोंगरदऱ्यातील तांडयामधून फिरताना त्यांनी परंपरा सामाजिक मूल्य, संस्कृती जपण्याचे उपदेश केले.

 संत सेवालाल यांचा जन्म १५ फेब्रुवारी१७३९ रोजी आंध्र प्रदेशातील डोडीतांडा या ठिकाणी झाला. त्यांचे वडील भीमा नायक व आई धरमणी हे होते. संत सेवालाल लहानपणापासूनच जिद्दी स्वभावाचे होते. निरक्षर,निर्धन, मेहनती, इमानदार अशा कुटुंबांमध्ये त्यांचा जन्म झाला. ते जसे जसे मोठे झाले तसे त्यांना समाजातील दुरावस्था पाहून वाईट वाटू लागले आणि समाजाची सेवा करण्याचे व्रत त्यांनी केले.  त्यांनी लोकगीतातून समाजातील परिस्थिती, मागासलेपणा,चालीरीती,संस्कृती ,निसर्ग , समाजातील एकमेकाचे संबंध याबद्दल जनजागृती करण्याचे काम केले, ते म्हणतात:

 यी सतयुग छ, 

  येर बाद कलियुग आये।

कलियुगेम कल्लोळ चालिये, 

मायेन बेटा भारी वीय ।

   लोकगीतांमधून त्यांनी त्यांच्या काळाला ' सतयुग' असे म्हटले आहे. त्याचबरोबर यानंतर येणारा काळ हा 'कलियुगा'चा असेल या काळामध्ये खुपच कल्लोळ असेल असे त्यांनी सांगितले. कुटुंबातील आई- वडील, आई- मुलगा, वडील-मुलगा या नात्यांमध्ये वाढत जाणारी कटुता याबद्दलही त्यांनी भाष्य केलेले दिसून येते. कलियुगाला सेवालाल महाराजांनी  'यंत्राचे युग ' म्हटले होते आणि आज आपण पाहत आहोत त्यांनी सांगितलेले तंतोतंत खरे होत आहे. मोबाईल, इंटरनेट या विज्ञानाच्या बदलामुळे एकमेकातील संवाद, कुटुंबातील सुसंवाद कमी होताना दिसत आहेत. एकमेकाबद्दलचे भाव बदलताना दिसत आहेत.

रुपिया कटोरों पाणी वक जाय ,रपियार तेर चना वकीय।

 बाइरो राज आय, सोनेर सिंग गवा वकजाय।

    संत सेवालाल आपल्या  उपदेशातून सांगतात, कलियुगामध्ये प्रत्येक गोष्टीचे महत्त्व वाढणार आहे आणि या महत्त्व वाढण्याबरोबरच प्रत्येक गोष्टीची किंमत ही वाढणार आहे . आता फुकट मिळणाऱ्या पाण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतील , या काळात महागाई खूप वाढेल. चिमुटभर हरभऱ्यासाठी पैसे मोजावे लागतील असे भाकित  सतयुगामध्येच आपल्या शिष्यांना लोकगीतातून केलेले दिसते. कलयुगामध्ये प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर राहतील . समाजकारण, राजकारण, समाज सुधारणा, शिक्षण, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया ठसा उमटवतील आणि स्वतःला सिद्ध करतील असे संत सेवालाल महाराज यांनी सतयुगामध्ये सांगितले होते. आज भारतातील स्त्रिया  प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचे आपल्याला दिसून येते . बंजारा समाजामध्ये पूजनीय असणारे गाय, बैल, घोडा, म्हैस या पाळीव प्राण्यांना देखील सोन्यासारखा भाव येईल, त्यामुळे कलियुग हे अनेक संकटे घेऊन येईल असे आपल्या शिष्यांना ते सांगतात.


 तम सोता आपणें जीवणेंम दिवो लगा सकोछो; 


कोयी केनी भजो, पूजो मत; कोयी केती कमी छेनी।              


सोतार वळक, सोता कर लिजो। 


भजनेम वेळ घाले पेक्षा; करणीं करेर सिको। 


मारी सिकवाडी पर धेन दिजो


जाणंजो, छाणंजो, पचज माणंजो "

 कोणीही कोणाचा उद्धार करत नाही आपला उद्धार आपल्याला स्वतःलाच करावा लागतो , कोणीतरी महापुरुष माझ्या जीवनात येईल आणि सर्व काही बरे होईल असे म्हणत बसण्यापेक्षा  स्वतःवर विश्वास ठेवा त्यामुळे स्वतःच्या जीवनातील अंधार नष्ट होवून प्रकाशमय दिवे तुमच्या जीवनात लागतील. गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना 'स्वयं दीप भव' या विचाराने प्रेरित केले होते. त्याचप्रमाणेच संत सेवालाल महाराज देखील आपल्या शिष्यांना स्वतःवर विश्वास ठेवा असे सांगतात. कोणत्याही देवाला पुजत बसण्यापेक्षा स्वत:चे कार्य करत रहा आणि त्यातूनच स्वतःचा मार्ग निवडा. जीवनामध्ये कोणीही कोणापेक्षा छोटा किंवा मोठा नाही. सर्वजण समान आहेत त्यामुळे स्वतः च्या आतील' आत्मविश्वास 'आपल्या जीवनामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करतो. स्वतःचे विचार आणि चरित्र चांगले ठेवा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका त्याची व्यवस्थित माहिती घ्या आणि त्यानंतरच विश्वास ठेवा असा मोलाचा संदेश संत सेवालाल महाराज आपल्या लोकगीतातून देताना दिसतात.


                  संत सेवालाल महाराजांच्या निसर्गवादी विचाराची सध्या खूप गरज आहे. जंगलातील झाडे ही आपली खरी साधनसंपत्ती आहे . तेच आपल्याला सर्वात जास्त उपयोगी असतात त्यामुळे निसर्गावर प्रेम करा असा मोलाचा संदेश देखील ते देतात.


      बंजारा समाज हा मुळातच मानवतावादी व सर्वांच्या कल्याणाची मनोकामना करणारा समाज आहे. त्यांनी स्वतःच्या कल्याणासाठी ईश्वरी शक्तीकडे प्रार्थना केलेली नाही. लोक कल्याण व समाजहीत हेच त्यांनी आपल्या डोळ्यासमोर  ठेवलेले होते. याची प्रचिती आपल्याला गोर बंजारांच्या पुढील पारंपरिक प्रार्थनेतून लक्षात येते.



                सेन साई वेस,


 गोर कोरेन साई वेस, किडी मुंगीन साई वेस


         जीव जनगाणीन साई वेस 


           खुटा मुंगरीन साई वेस


     भलेती भेट करा । सत्ते काम फत्ते कर, 


 कचेरिरे पाचेन काढ; सावकारेर मुंडांग रखाड


               सेन साई वेस"



     समाजाबद्दलची जाणीव, प्रेम,त्याग,समाजवृत्ती यांचा स्वीकार करून समाजात परिवर्तन घडवावे असे संत सेवालाल यांना वाटत होते हे त्यांच्या निस्वार्थी विचारातून स्पष्ट होते. संत सेवालाल महाराज यांनी लोकगीतातून निसर्ग,आदर, प्रेम, जिवजंतू, लहान मुले, आई-वडील यांच्या बद्दल विशेष लक्ष देऊन गोरबंजारा


समाजाला उपदेश केले आहेत. त्यामुळेच त्यांच्या लोकगीतातून , विचारातून आणि संदेशातून समाजहित,समाजसेवा, गरीबासाठीची तळमळ जाणवते या कलयुगात आपण त्यांच्या विचारांचे- आचाराचे आचरण करणे हीच संत सेवालाल महाराज यांना खरी श्रद्धाजंली ठरेल.


संतोषकुमार शंकर राठोड


सहशिक्षक,जि. प प्रा.शाळा बोधेगाव


ता.शेवगाव जि. अहमदनगर


भ्रमणध्वनी-९८५०२४६१५०

To Top