वेळू हे आदर्श विकासाचे गाव:-आमदार संग्राम थोपटे.
वेळू येथे सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न.
खेडशिवापुर (प्रतिनिधी) :-
वेळू गावात एका वर्षात सात कोटी रुपयांची विकासकामे करणारे वेळू (ता.भोर) हे तालुक्यातील पहिलेच व आदर्श गाव असेल असे मला वाटते, त्याचप्रमाणे पुणे सातारा रस्त्याच्या दोन्ही बाजूला विभागले गेलेले व डोंगराळ भागात असणारे वेळू गावातील स्मशानभूमी ही तालुक्यातील ग्रामीण भागातील एक नंबरची स्मशानभूमी आहे हे सांगायला मला अभिमान वाटत असून सकारात्मक विचारामुळे गावची विकासकामे मोठ्या प्रमाणावर होत आहे, हा दिवस वेळूच्या गावच्या इतिहासातील सोनेरी पान आहे.असे प्रतिपादन भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
वेळू (ता.भोर) या गावामधील विविध विकास कामांच्या उदघाटन समारंभा प्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, वेळू येथील इंडस्ट्री चा फायदा भोर तालुक्यातील तसेच इथल्या भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य कसे मिळेल याकडे जास्त लक्ष असून भोर तालुक्यातील तरुण-तरुणींना रोजगाराची संधी आगामी काळात उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. पुढे ते म्हणाले, वेळू गावाचा नकाशा पाहिला तर त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आहेत. पश्चिम भागात पूर्णपणे उद्योग व्यावसायिक आहेत तर पूर्व भाग अजूनही मोकळा आहे. गावातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने पूर्व भागात व्यावसायिक जाण्यास टाळाटाळ करतात. यासाठी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी बोलून येणारा रिंगरोड हा शिंदेवाडी, गोगलवाडी मार्गे वेळूमध्ये कसा येईल हे पाहिले जाईल म्हणजे या भागात उद्योग येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
दरम्यान थोपटे म्हणाले की, ग्रामीण भागात मी सलग तीन वेळा आमदार म्हणून काम पहात आहे, मात्र आजपर्यंत वेळू गावातील उद्योग व्यावसायिकांनी जो सीएसआर फंडातून गावाच्या विकासासाठी निधी दिला आहे तो इतर कोठेही दिला गेला नाही, आणि या कार्यासाठी मी त्यांना सलाम करतो. माझ्या कार्यक्षेत्रात हिंजवडी सारखा भाग येतो, त्याठिकाणी आयटी पार्क हे क्षेत्र येते, तिथे मोठ्या प्रमाणात उद्योग व्यावसायिक आहेत, मात्र त्यांची अशाप्रकारे निधी देण्याची दानत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. याला मात्र वेळू हे गाव अपवाद आहे. काम योग्य पद्धतीने चालतय का?, काम करणारी माणसे प्रामाणिक आहेत का? हे सर्व पाहूनच उद्योग व्यवसायकांनी मदत केली आहे असे वाटते. यावेळी वेळू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन विभागाचे माजी सभापती आण्णासाहेब भिकुले, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, जि. प.सदस्य विठ्ठल आवाळे, शैलेश सोनवणे, पुण्यनगरीचे नगरसेवक वसंत मोरे, बाळाभाऊ धनकवडे ,उद्योजक सोमनाथ सोमाणी,भोर पंचायत समितीचे उपसभापती रोहन बाठे, पोपटराव सुके, माजी आदर्श सरपंच माऊली पांगारे, अशोक वाडकर,सरपंच आप्पासो धनावडे, उद्योजक जीवन शेठ धनावडे ,मंगेश सूर्वे, उपसरपंच छाया पांगारे, ग्रा.पं. सदस्य हिरामण पांगारे, सुरेश पांगारे, अमोल पांगारे, संगीत पांगारे, पुष्पा काळे, सुजाता खुंटे, तसेच बापू पोळेकर, श्रीपती पांगारे, पांगारे ऍग्रोचे ज्ञानेश्वर पांगारे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पांगारे यांनी प्रास्ताविक केले. प्रसिध्द निवेदक विठ्ठल पवार यांनी सूत्रसंचालन केले.
वेळु गावचे आदर्श माजी सरपंच व भोर तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पांगारे म्हणाले, गावच्या विकासासाठी मतभेद मनभेद विसरून एकत्र आले, तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होतात. वेळू गावात गेल्या वर्षभरात झालेली विकासकामे हे त्याचे उदाहरण आहे." आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून वेळू गावच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली. मागील काळात रखडलेली कामे मार्गी लागली तसेच विकास कामांना मुबलक प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे.
