कासुर्डी गु.मा. येथे सावित्रीच्या लेकींचा सन्मान.
कासुर्डी गु.मा. येथे आळंदे केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
कापूरहोळ (प्रतिनिधी) :-
प्राथमिक शिक्षण हे शिक्षण व्यवस्थेचा पाया आहे आणि तो पाया भक्कम आणि सशक्त करण्याचे काम, प्राथमिक शिक्षक हे कुशल पद्धतीने करीत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकडे शिक्षकांनी लक्ष देऊन त्या पद्धतीने आगामी काळात देखील काम केल्यास निश्चित यश मिळेल असे प्रतिपादन आळंदे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी केले.
आळंदे केंद्राची शिक्षण परिषद कासुर्डी गु.मा. येथे संपन्न झाली, त्यावेळेस कोठावळे बोलत होत्या, प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आळंदे केंद्रातील महिला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कासुर्डी गु.मा. च्या सरपंच सारीका मालुसरे यांनी संपन्न होत असलेल्या प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या.
या शिक्षण परिषदेत शाळेच्या विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली . अर्चना पंडित, हेमलता काळे व सचिन गोळे,दीपाली गोर्हे या शिक्षकांनी उपस्थित शिक्षकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात हस्ताक्षर प्रशिक्षण घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक संजय बरकडे यांनी मानले.
