शिवरायांचा वारसा रायरेश्वर टपाल पाकिटाने जगभरात.
भोर : जगातील पहिल्या लोकशाहीवादी राष्ट्राची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरेश्वरावर केली. त्या किल्ले रायरेश्वराचा इतिहास भारत सरकारच्या हिंदवी स्वराज्य शपथभुमी रायरेश्वर या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोहचणार आहे. असे प्रतिपादन इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी केले.
भारत सरकारच्या टपाल खात्याच्या वतीने व रायरेश्वर ग्रामथ संस्था यांच्या पुढाकाराने तसेच बायोस्फिअर्स संस्था यांचे सहकार्याने रायरेश्वर हिंदवी स्वराज्य शपथभूमी विशेष टपालाचे प्रकाशन किल्ले रायरेश्वर ता.भोर येथे आज (दि.१७) पुणे टपाल विभागाच्या संचालिका सिमरन कौर यांच्या हस्ते करण्यात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताजी नलावडे बोलत होते.
बायोस्फिअर्स चे अध्यक्ष डॉ.सचिन पुणेकर ,पुणे विभागाचे वन संरक्षक नानासाहेब लडकत रायरेश्वर संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय जंगम उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. सचिन पुणेकर यांनी केले. त्यांनी शिवकालीन इतिहास व पर्यावरणाचे रक्षण याची माहिती दिली.
टपाल खात्याच्या संचालिका सिमरन कौर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आदर्शवादी लोकराजे व प्रशासक आहेत. त्याचां इतिहास देशभरात पोहचण्यासाठी टपाल खाते विशेष टपाल पाकिट प्रकाशित करणार आहे.
छत्रपती शिवरायांनी रायरेश्वरावरील शंभू महादेव मंदिरात वयाच्या१५ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अठरापगड जातीच्या मावळ्यांना शिवरायांनी इथे स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. शिवरायांच्या विश्ववंदीय लोककल्याणकारी कार्याच्या स्मृतीनां विशेष टपाल पाकीटामुळे उजाळा मिळाला आहे.
आम्ही भोरकरचे अध्यक्ष समीर घोडेकर, सचिन देशमुख ,सुनिल चिकणे ,सुधीर तनपुरे, काळुराम धावडे ,टपाल खात्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद भोसले,संतोष शिवतरे ,पराग शिळीमकर, सुनिल जंगम, आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन विठ्ठल दानवले . आभार रविंद्र जंगम यांनी केले.
