२१ डिसेंबर पासुन कल्याण ते विधानभवन मुंबई पायी पेन्शनमार्च !
जूनी पेन्शन साठी सर्व संघटनांच्या समन्वय समितीची वज्रमूठ !
नसरापूर( प्रतिनिधी).
दि. १ नोंव्हेंबर २००५ नंतर शासकिय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २१ डिसेंबर पासुन ‘पडघा कल्याण’ येथुन महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती च्या वतीने पायी पेन्शनमार्च चे आयोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर पासुन सुरू झालेला पेन्शनमार्च २४ डिसेंबर रोजी विधानभवन मुंबई येथे पोहचणार असुन पुढे दिनांक २५ डिसेंबर पासुन विधानभवनावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जूनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी दिली.
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन ऐवजी नविन परिभाषित अंशदायी निवृत्त वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. या डीसीपीएस योजनेचे रुपांतर अलीकडेच राष्ट्रीय निवृत्त योजनेत (एनपीएस ) मध्ये झाले आहे काही विभागात रुपांतरणाची प्रक्रिया चालू आहे. कर्मचाऱ्यांनी या पेन्शनऐवजी जूनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी सुरूवातीपासून केली आहे.
जूनी पेन्शन योजनालागू करावी या मागणीसाठी जूनी पेन्शन संघटने कडून विविध मोर्चे , आंदोलने केली आहेत. सध्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागातील सर्व संघटनांनी एकत्र येत जूनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीची स्थापना करण्यात आली व या समन्वय समितीच्या माध्यमातून २२ नोव्हेंबर २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ या काळात राज्यातील सर्व जिल्हयांमधून पेन्शन संघर्ष यात्रा काढण्यात आली . या यात्रेदरम्यान सर्व जिल्हयांमध्ये पेन्शन संघर्ष मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभला . प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो कर्मचारी मेळाव्यास उपस्थित होते. पुणे जिल्हयात राजगुरूनगर येथे झालेला पेन्शन संघर्ष मेळावा उल्लेखनीय संपन्न झाला.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान पायी पेन्शन मार्च पडघा ( कल्याण ) ते विधानभवन असा काढण्यात येणार आहे. या मार्चच्या पुणे जिल्हयाच्या नियोजनासाठी जूनी पेन्शन संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय , निमशासकीय विभागाचे सर्व डीसीपीएस ,एनपीएस धारक कर्मचारी हजारोंच्या संख्येने या पेन्शन मार्च ला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी सांगितले.
पेन्शन मार्चमध्ये पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त डीसीपीएस एनपीएस धारकांनी उपस्थित राहुन पेन्शनमार्च यशस्वी करावा असे आवाहन सरचिटणीस वैभव सदाकाळ यांनी केले आहे.
या बैठकीस कार्याध्यक्ष योगेश ठोसर , कोषाध्यक्ष विनायक शिंदे, मिडीया प्रमुख सोमनाथ कुदळे , शिरूर अध्यक्ष बबन म्हाळसकर , दौंड अध्यक्ष महादेव बंडगर, इंदापूर अध्यक्ष संतोष हेगडे , भोर अध्यक्ष प्रविण नांदे , जुन्नर अध्यक्ष प्रभाकर दिघे , मावळ अध्यक्ष प्रकाश सातपुते , मुळशी अध्यक्ष ज्योती दवणे, विठ्ठल भटकर, विशाल शिंदे, राहुल घोडे, विद्या सातपुते उपस्थित होते.
