गुरूंप्रति कृतज्ञता ठेवा:-केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे.
शिक्षक व केंद्रप्रमुख यांचा सन्मान संपन्न .
नसरापूर (प्रतिनिधी)
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते .भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या आपणास ज्ञात आहेत. जनक याज्ञवल्क्य, द्रोणाचार्य -अर्जुन,विश्वामित्र- राम, सुदामा- सांदीपनी शुक्राचार्य- जनक अशी गुरू-शिष्याची परंपरा आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते, ती पौर्णिमा म्हणजे प्रकाश, ती पौर्णिमा म्हणजे ज्ञान, आणि एकमेकांना समृद्ध करतात. ते गुरु, म्हणून गुरूंच्या प्रति आपले मन कृतज्ञतेने भरून येते आणि त्यांच्या चरणी आपले मस्तक नम्र होते असे प्रतिपादन आळंदे केंद्राच्या प्रभारी केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे कदम यांनी केले.
आळंदे केंद्र अंतर्गत असणाऱ्या शाळांना केंद्रप्रमुख कोठावळे यांनी भेट देत शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत शैक्षणिक सुसंवाद साधला. तसेच आळंदे केंद्रातील शिक्षक-बंधू भगिनींनी देखील कोठावळे यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला. आळंदे केंद्रातील शाळांना भेट देत आळंदे वाडी शाळेतील शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी कोठावळे यांनी सुसंवाद साधला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली घोरे यांनी करत आभार रामदास साळवी यांनी मानले.

