वेल्हे तालुक्यातील दुर्गम वस्त्यांवर लवकरच वीजपुरवठा
खा. सुप्रिया सुळे यांची माहिती.
पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) -
वेल्हे तालुक्यातील वरघड गावातील गोपाळवाडा, चिमुकडी वस्ती व केळवण वस्ती या दुर्गम भागातील वस्त्यांतील अंधार लवकरच दूर होणार आहे. याठिकाणी विद्युत पुरवठा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे आणि महावितरणचे सहायक अभियंता अभिजीत भोसले यांनी या गावांना भेट देऊन पाहणी केली.
या कामासाठी सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार प्रवीण शिंदे यांनी भोसले यांना प्रत्यक्ष या गावांत नेऊन सद्यस्थितीत काय अवस्था आहे, ते दाखवून दिले. त्यानुसार येत्या गुरुवारी महावितरणच्या पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महावितरण कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. भोसले यांच्या गाव भेटीप्रसंगी शिंदे यांच्यासह अजिंक्य पोळेकर, राम भरेकर तसेच वरघड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सुळे यांनी याबाबत संबंधित यंत्रणांना सुचना केली होती. ही गावे दुर्गम असल्याने तेथे वीजपुरवठा करण्याबाबत काही अडचणी असल्या तरी त्यावर मात करण्याबाबत आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन या वस्त्यांवरील प्रत्येकाच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी आम्ही सकारात्मक प्रयत्न करीत आहोत. या संदर्भात येत्या गुरुवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

