दिलीप अप्पा बाठे यांचे निधन.
कापूरहोळ( प्रतिनिधी):-
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्याच्या,समाज व राजकारणातील वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व लाभलेले काँग्रेस पक्षाचे संघटक, फ्रर्डे वक्ते,अडीच दशकांचा राजकारणाचा दांडगा अनुभव असलेले प्रगल्भ व सर्वसमावेशक नेतृत्व दिलीप अप्पा बाठे यांचे आज दि.15 एप्रिल 2021 रोजी भोर तालुक्यातून हरवले आहे.
दिलीप बाठे हे राजकीय दृष्ट्या भोर तालुक्यातील महत्वाचे व्यक्तिमत्त्व होते. भोर,वेल्हा मुळशी तालुक्यात कॉग्रेस पक्षास बळकटी देण्याचे त्यांनी काम केले होते.त्यांच्या अकस्मात जाण्याने भोर तालुक्याची राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, क्रीडा, सहकार ,आध्यात्मिक ,कृषी आदी क्षेत्राची खूप मोठी हानी झालेली आहे. सोशल मीडियावर दिलीप अप्पा यांच्या निधनाची बातमी कळताच प्रत्येकाने श्रद्धांजली वाहत अतीव दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
भोर तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि राजकारणातील मास्टरमाइंड म्हणून ओळख असलेले दिलीप अप्पा गेली 15.दिवस ते व्हेंटीलेटरवर होते. दिलीप बाठे हे अमृता उद्योग समूहाचे संस्थापक,कामधेनू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भूविकास बँकेचे मा. संचालक,पुणे जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष, गुंजवणी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक,जय हरी ग्रुपचे संस्थापक सदस्य,खेडशिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे मुख्य समन्वयक, आदी लोकपयोगी पदांवर ते कार्यरत होते. .
भोर तालुक्याच्या समाज राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, लोकांच्या सुखदुःखात दिलीप अप्पा कायमच सहभागी होत असत. ते नेहमी म्हणायचे, "नागरिकांच्या आनंदात मागे असावं, मात्र दुःखात पुढे" असण्याचा त्यांचा स्थायी स्वभाव होता.भोर तालुक्याच्या अनेक चळवळीत ,सामाजिक प्रश्नांसाठी सतत दिलीप बाठे कार्यरत होते. युवकांना दिशा देणारे नेतृत्व, सर्वांशी कायम प्रेमाने वागणारा नेता ,आधुनिक श्रावण बाळ अशी ओळख असलेले असामान्य व्यक्तिमत्त्व दिलीप अप्पा यांचे अचानक जाणे,हे तमाम भोर तालुक्यातील नागरिकांच्या मनाला खूप वेदना देणारे आहे. आप्पा यांची एक्झिट म्हणजे सामाजिक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या नेत्याची पोकळी कायम जाणवणार आहे.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दिलीप अप्पा बाठे यांनी टेल्को कामगार चळवळीतून राजकीय प्रवासास सुरुवात केली.रायरेश्वर दिडींतून ते दरवर्षी पायी पंढरीच्या वारीला जात असत. याशिवाय जय हरी ग्रुप च्या माध्यमातून हजारो भाविकांना ते दरवर्षी तिर्थक्षेत्रांचे दर्शन घडवीत होते. अप्पा यांच्या निधनाची बातमी कळताच पुणे जिल्ह्यातील नागरिक,महिला,आबालवृद्ध, तसेच पदाधिका-यांनी, अधिका-यांनी दुःख व्यक्त केले.
त्यांच्यामागे पत्नी, एक विवाहीत मुलगी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. भोर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आणि भोर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष रोहन बाठे यांचे ते वडील होत.
"भोर तालुक्याचा एक आदर्श व प्रेरणादायी नेता" अशी दिलीप बाठे यांची वेगळी ओळख होती. तत्कालीन खेड लोकसभा निवडणुकीत दिलीप बाठे यांचे उत्कृष्ट सामाजिक व राजकीय काम जवळून पाहिले. प्रचंड जनसंपर्क व कसदार ,मर्मभेदी भाषणशैलीमुळे ते सर्वदूर परिचित असा लोक नेता होते. त्यांच्या अकस्मात निधनाने राजकारणाची हानी झाली असून एक चांगला सहकारी मित्र हरवला आहे. बाठे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
( मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील)
(बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-९२२६८००७८३)


