निलिमा शिंदे यांना 'राजमाता जिजाऊ आदर्श माता' पुरस्कार.
भोर (प्रतिनिधी):-
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मंगळवार दि.१२ जानेवारी २०२१ रोजी लाल महाल पुणे येथील पवित्र वास्तुमध्ये अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन,अखिल शिवाजीनगर शिवजयंती उत्सव समिती,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने बाजारवाडी ता.भोर येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक भिमराव शिंदे यांच्या पत्नी आदर्श प्राथमिक शिक्षिका निलिमा शिंदे यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी मा.विजयसिंह देशमुख यांचे हस्ते राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निलिमा शिंदे यांनी प्राथमिक शिक्षिकेची जबाबदारी सांभाळत शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर स्वतःच्या तीन अपत्यांना उच्चप्रतीचे उच्चशिक्षण देऊन समाजापुढे आदर्श माता म्हणून एक वेगळा चांगला आदर्श निर्माण केला आहे.डॅा.पूजा हिने शालांत परिक्षेत ९६.५५% गुण मिळविले आहेत. डिसेंबर २०२० मध्ये एम्स दिल्ली तर्फे देशपातळीवर घेण्यात आलेल्या एमडीएस प्रवेश परिक्षेत ९९.९% पर्सेंटाईलने देशात सातवा नंबर मिळवून दिल्ली येथील एम्स कॅालेजमध्ये ती दंत वैद्यकिय शिक्षण घेत आहे.प्रियांका हिने शालांत परिक्षेत ९६.३६% गुण मिळवून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.प्रज्वल याने शालांत परीक्षेत ९५.४०% गुण मिळवून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.केवळ गुण म्हणजे सर्वस्व नसून निलिमा शिंदे यांनी मुलांना कराटे ब्लॅकबेल्ट,चित्रकला,नृत्य आणि भाषण कला यांचे अतिशय उत्कृष्ट शिक्षण दिले आहे.विविध कला,क्रिडा प्रकारातील अनेक पारितोषिके मुलांनी मिळवली आहेत.नोकरी आणि घर प्रपंच सांभाळत मुलांना दिलेले उच्च शिक्षण त्यांच्यावर केलेले सुसंस्कार या त्यांच्या कर्तुत्वाची दखल घेऊन इतरांना प्रोत्साहन मिळावे आणि समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा म्हणून निलिमा शिंदे यांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिवशी आणि त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने मला विशेष आनंद होत असल्याचे निलिमा शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमास मा.विजयसिंह देशमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे,मा.नवनाथ जगताप धर्मादाय आयुक्त, मा.संदिप कदम सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका मा.राजेंद्र डुबल मा.विकास पासलकर मा.कैलास वडघुले तसेच अनेक शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.