हिंदवी स्वराज्य संकल्पभूमी रायरेश्वरला जाणाऱ्या स्थानिकांसह पर्यटकांचा प्रवास होणार सुखद.
भोर (प्रतिनिधी)–
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह असंख्य शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असलेले भोर तालुक्यातील रायरेश्वर येथील प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर,केंजळगड आणि त्यासोबतच सभोवतालचे निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि देशातूनच नाही तर परदेशातूनही असंख्य पर्यटक तिन्ही ऋतूमध्ये या ठिकाणी भेट देत असतात. मात्र या पर्यटन क्षेत्राला जोडला जाणारा प्रमुख मार्ग भोर ते कोर्ले असा जवळपास २० किलोमीटरचा रस्ता गेले अनेक वर्षापासून अत्यंत वाईट अवस्थेत असल्याने या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. स्थानिक तरुणांनी तर समाजमाध्यमावर याविरोधात उघडउघड नाराजी व्यक्त करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाची तयारी केली होती. मात्र यासाठी रायरेश्वर युवा प्रतिष्ठानच्या असंख्य कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा योग्य पाठपुरावा केल्याने या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी आवश्यक असणारी खडी व मनुष्यबळही उपलब्ध झाले असल्याची माहिती रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळेकर यांनी दिली. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते फक्त एवढ्यावरच न थांबता संपूर्ण रस्त्याच्या कामाच्या दर्जाकडे स्वत: जातीने लक्ष घालतील आणि स्थानिकांना आणि पर्यटकांना होणाऱ्या त्रासापासून कायमचे मुक्त करतील असे प्रतिष्ठानचे भोर तालुका उपकार्याध्यक्ष धनाजी पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.