राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:- ग्रामपंचायत हरिश्चंद्रीची मागणी.
अन्यथा ग्रामस्थांचे होणार आंदोलन.
भोर ( प्रतिनिधी)
20 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या अपघातात राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे बाबतचा अर्ज ग्रामपंचायत हरिश्चंद्री यांनी राजगड पोलीस स्टेशन नसरापुर येथे दि. 21 रोजी दाखल केलेला आहे .
सदर ग्रामपंचायत हरिश्चंद्री यांनी दिलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, 20 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी सातच्या सुमारास दीपक मंडल वय 25 हे कामानिमित्त कापूरहोळ गावाकडे जात असताना भरधाव वेगाने पुण्याच्या बाजूने येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सदर इसम जागीच मृत्यू पावला याबाबत राजगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल आहे. परंतु हरिश्चंद्री गावातील नागरिकांनी गेले चार ते पाच वर्षापासून अपघाताच्या ठिकाणी भुयारी मार्ग व उड्डाणपुलासाठी मागणी केलेली आहे. गावातील 65 टक्के लोकांची शेती महामार्गाच्या विरुद्ध बाजूला असल्याने ग्रामस्थांना व शेतकरी बांधवांना वारंवार हा धोकादायक महामार्ग पार करावा लागतो. महामार्गाला दुभाजक असल्याने शेतकरी मित्रांची जनावरे गुरे बैल व शेतीची अवजारे यांना रस्ता पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या नाहीत. ही उणीव संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगून कोणताही अधिकारी याची दखल घेत नाही. म्हणून जिल्हाधिकारी व प्रशासन यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा महामार्ग अधिकारी यांना याचे गांभीर्य दिसत नाही म्हणून वरील अपघातास व अपघात मयत पावलेल्या व्यक्ती अधिकारी वर्ग जबाबदार आहे. म्हणून दिपक मंडल वय 25 यांच्या मृत्यू सदर अधिकारी वर्गाला दोषी धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा गावातील नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाचे राहील असे ग्रामपंचायत हरिश्चंद्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पोलीस स्टेशनला निवेदन देताना भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे,राम पाचकाळे,संतोष गाडे,सरपंच संध्या गाडे,उपसरपंच दत्तात्रय बाठे, सदस्य सुनीता गाढवे,सदस्य शरद लोहार, तंटा मुक्ती अध्यक्ष उत्तम गाडे,शशिकांत गाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

