खेड शिवापूर परिसरातील सावकाराच्या आवळल्या मुसक्या.
राजगड पोलिसांची कारवाई.
राजगड पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल.
सिंहगड (वार्ताहर)
फेब्रुवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 दरम्यानच्या काळात व्याजाने पैसे देऊन तसेच फसवणूक करून जमीन लाटण्याचा प्रकार एक खाजगी सावकार करत होता. जुलमी व अन्याय कारक पद्धतीने व्याजदर आकारून त्रास देत होता.सदर सावकारी करणाऱ्या व्यक्तीबाबत फिर्याद दिल्यानंतर राजगड पोलिसांनी तात्काळ त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आदिनाथ शंकर वाडकर रा.श्रीरामनगर (ता.हवेली) असे अवैद्य सावकारी करणाऱ्याचे नाव आहे. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ याने शिवापूर (ता.हवेली) येथील युवक धीरज शिंदे (वय 30) याला फेब्रुवारी मध्ये दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने दिले होते. काही दिवसांनी धीरज यास पैशाची चणचण भासू लागल्याने पुन्हा व्याजाने पैसे दिले, मात्र यावेळी तुला नळ कनेक्शन देतो असे सांगून त्यास व त्याच्या आईस भोर येथे घेऊन जाऊन कुठल्यातरी कागदावर सही व अंगठा घेण्यात आला होता. त्यानंतर एक लाख रुपये देण्याचे ठरले मात्र, त्याच्या नावाने चेक वटवून फक्त पंचवीस हजार देण्यात आले. असे व्यवहार दोनवेळा झाले मात्र कालांतराने सही व अंगठ्याच्या आधारे धीरज व त्याच्या आईच्या नावावर असलेली शेत जमीन आदिनाथ ने स्वतःच्या नावावर केल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती विचारताच दमदाटी करू लागला व जीवे मारण्याची धमकी दिली. याची माहिती राजगड पोलिसांना दिल्यानंतर राजगड पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी लागलीच सूत्रे हाती घेऊन बेकायदेशीर रित्या सावकारी करणाऱ्या आदिनाथ वाडकर याला पो.ह. संतोष तोडकर यांना सांगून अवघ्या अर्ध्या तासात वाडकर याला ताब्यात घेण्यात आले. त्यावर कलम 420, 504, 506 सावकारी अधिनियम 44, 45 (क) या अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के.वाय. सागवेकर करीत आहेत.
(पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांचे पोलीस खात्यात उत्कृष्ट काम असून ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले ,तेथील कारकीर्द उल्लेखनीय व कौतुकास्पद राहिली आहे, त्याचप्रमाणे राजगड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदाची सूत्र हाती घेतल्यावर खासगी सावकारावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक केली.त्यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांनी केलेल आहे.)

