कशी करावी वारी
कार्तिक शुध्द एकादशी.
पुणे (विशेष प्रतिनिधी)
"काया ही पंढरी"
"कार्तिकी एकादशी...,
वारकऱ्यांच्या दृष्टीने प्रमुख दोन वाऱ्या पैकी अतिशय महत्त्वाची वारी... स्वतः भगवंत सुखाच्या प्राप्तीचे गूज सांगतात...
आषाढी कार्तिकी विसरू नका मज ! सांगत असे गूज पांडूरंग!!
परंतू कोरोनाच्य पार्श्वभूमीवर संचारबंदी मुळे वारकरी आषाढी प्रमाणेच कार्तिकी सोहळ्याला सुद्धा पारखे झाले आहेत...
समयासी सादर व्हावे या न्यायाने आहे त्या ठिकाणी, पंढरीची वारी कशी करावी ...हे प्रस्तुत अभंगात श्रेष्ठ शांतिब्रम्ह एकनाथ महाराज सांगत आहेत...
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
आपले शरीर हेच पंढरपूर आहे तर आत स्थित चैतन्य घन जीव ,आत्मा हाच विठ्ठल आहे ..एकमेव तोच सर्वघटी पांडुरंग रुपाने नांदत आहे..
भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे ।बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
भाव आणि भक्तीच्या नेत्रा वाटे प्रेम रूपाने वाहत असलेल्या उदकातून वाहणारी हीच ती चंद्रभागा भीमा जिथे पांडुरंग शोभायमान होत आहे....
*दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट ।मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥*
ज्या वाळवंटात भजन कीर्तन नाम गुजरा चा खेळ मांडायचा आहे ते वाळवंट म्हणजेच दया-क्षमा-शांती जिथे या सर्व गुणांनी संपन्न आशा वैष्णवांचा थाट एक मेळा व्हावा..
ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद ।हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
ज्ञान ध्यान पूजा यातून मिळणारा निखळ आणि शाश्वत आनंद त्या आनंदाच्या सुरेल स्वरात जीवन वेणू जुळुन जावा. आपल्याबरोबरच इतरांशी जीवनही सुरेल पणे सजावे...
दश इंद्रियांचा एक मेळ केला ।ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
त्रयोदशीला काला करायचा आहे तो कसा तर दहाच्या दहा इंद्रियांचे शमन करून भगवंताच्या चरणी एकविध करावे..
हाच गोपाळकाला आपल्याला अनुभवता यावा..
देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं ।एका जनार्दनी वारी करी ॥६॥
नाथ म्हणतात ती पांढरी देही, जनी, वनी सर्वत्र मी पाहिले..
आणि त्याच पंढरीची आजन्म वारी केली..
संत आणि भगवंत यांना अपेक्षित असलेली ही वारी सर्वांच्या जीवनात सदैव घडावी हीच माउलींच्या चारणी प्रार्थना.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
लेखन:-
श्री. गणेश रामदासमहाराज भगत-पुणेकर
(एम ए. संगीत, एम ए .साहित्य, एम.ए. तत्वज्ञान, बी. एड्. डी. एड.)
संपर्क -9860179188

