सासवड (प्रतिनिधी):-
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जेजुरी शाखेत येणारा कामाचा ताण पाहता बेलसर आणि पंचक्रोशीतील शेतकरी , नोकरदार , ग्रामपंचायती , शेती विविध कार्यकारी सोसायटया यांच्या सोयीसाठी बेलसर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नवी शाखा सुरू करावी, अशी मागणी बेलसर ग्रामस्थानी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेशआप्पा थोरात याना निवेदन देत केली आहे .
पुणे जिल्हा बँकेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात पुरंदर नागरी पतसंसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक अनिल उरवणे , राज्य शिक्षक समितीचे नेते महादेव माळवदकर पाटील , पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे मानद सचिव गणेश कामठे , शिक्षकनेते सुनील कांबळे , अमोल भुजबळ यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा शिक्षक समितीचे संपर्कप्रमुख संदीपआप्पा जगताप आणि युवक काँग्रेसचे नेते अमोल जगताप यांच्या हस्ते हे निवेदन रमेशअप्पा थोरात याना देण्यात आले .
राज्य सहकार परिषदेचे मा. अध्यक्ष ,मा. आमदार आणि बँकेचे तत्कालीन संचालक कै. चंदुकाका जगताप , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या विषयी प्रस्ताव दाखल केल्यापासून सातत्याने पाठपुरावा केला असून पुरंदर हवेलीचे आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक संजय जगताप आणि पुणे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन , विद्यमान संचालक डॉ.दिगंबर दुर्गाडे सर आजही या विषयी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन थोरात यांनी यावेळी केले. पुणे जिल्हा बँक ही राज्यातील नावाजलेली बँक असून बँकेने शेतकरी आणि नोकरदार यांची बांधिलकी नेहमी जोपासली आहे . नजीकच्या काळात बेलसरच्या नूतन शाखेचा मंजुरी चा विषय खात्रीने मार्गी लावू असे आश्वासन यावेळी रमेशआप्पा थोरात यांनी उपस्थिताना दिले.