नसरापूर-( प्रतिनिधी):
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
नसरापूर ता. भोर येथे ३ मे रोजी आढळलेल्या कोरोनाग्रस्त पती पत्नी उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून यामुळे संपूर्ण भोर तालुका देखील कोरोनामुक्त झाला आहे. या दाम्पत्यांचे रविवारी (दि.१७) त्यांचे नसरापूर येथे आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी, थाळ्यांच्या निनादात पुष्पवृष्टी करत त्यांचे जल्लोषात स्वागत करुन आनंद व्यक्त केला.
नसरापूर येथे २ मे रोजी कोरोनाग्रस्त व्यक्ती आढळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ मे रोजी त्यांची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दोघांवर पुणे येथे उपचार चालू होते. पंधरा दिवसाच्या उपचारानंतर दोघांच्याही इतर सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्याने त्यांची आज रुग्णालयातून मुक्तता करण्यात आली. भोर आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना नसरापूर येथे आणण्यात आले. यावेळी ते राहत असलेल्या गृहरचनासंस्थेच्या आवारात प्रशासन व रहिवाश्यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती लहुनाना शेलार, माजी उपसभापती रोहिणीताई बागल, स्वप्नलोक गृहरचना सोसायटीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, मंडलाधिकारी एस. बी. कंडेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, नसरापूरचे सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, डॉ.शितल टिके, औषध निर्माण अधिकारी विजय भिलारे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय साळुंके, आरोग्य सहाय्यक सुनील दिक्षीत, आशा पर्यवेक्षिका संगीता मांढरे, श्वेता जालिंदरे, सोसायटीचे सचिव मोहन शिळीमकर, एकनाथ अवचरे, शशिकांत पवार, मच्छिंद्र कुंभार, बाबू झोरे, इरफान मुलाणी, झाकीर हुसेन जमादार, चंद्रकांत सोनार, उत्तम भोसले आदी मान्यवर व सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते.
सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन यावेळी कोरोनामुक्त पतीपत्नींचे स्वागत करण्यात आले. तर सोसायटी मधील रहिवाशांनी आपापल्या घराच्या गॕलरीमधून पुष्पवृष्टी तसेच थाळीनाद करून स्वागत केले. कोरोनामुक्त उभयतांचे डोळे यावेळी भरुन आले होते. सर्वांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करुन सर्वांचे आभार व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते विठ्ठल आवाळे यांनी यावेळी नसरापूर कोरोनामुक्त राहण्यासाठी ग्रामस्थांसह आरोग्य विभाग प्रशासन, ग्रामपंचायत यांनी कसोशीने प्रयत्न करुन यश मिळवल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
गणेश अण्णा बागल यांनी सोसायटीच्या सर्व रहिवाशांनी नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्याने नवीन रुग्ण आढळले नसल्याने सर्वच रहिवाशी या यशाचे मानकरी असल्याचे सांगितले.