■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■ कापूरहोळ (प्रतिनिधी):--
नाकाबंदी आदेशातील शिक्षकांना होत असलेली शिवीगाळ व अरेरावीच्या घटनेबाबत व परतालुका व परजिल्हा शिक्षकांना सुट्टीचा कालावधीमध्ये आपापल्या गावी जाण्यासाठी परवानगी मिळणेबाबतचे निवेदन भोर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आले.
शिक्षक समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
भोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना एकूण 28 ठिकाणी नाकाबंदी साठी नेमणूक आदेश दिल्यापासून शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहे .परंतु 9 मे 2020 रोजी चेलाडी व मोरवाडी या चेक पोस्ट नाक्यावर शिक्षकांना अरेरावीची भाषा व शिवीगाळ काही समाजकंटकांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारची घटना गुरुजनासाठी व समाजासाठी दुःखदायक व खेदजनक आहे. तरी भोर तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने तसेच भोर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने या घटनांचा निषेध व्यक्त करतो. सदर नाकाबंदी साठी नेमलेल्या शिक्षकांना या नाकाबंदी या कामातून मुक्त करण्यात यावे. तसेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील नुकतीच घडलेली दुर्दैवी घटना यात नानासाहेब कोरे या प्राथमिक शिक्षकाच्या अंगावर ट्रक चालकाने ट्रक घातल्याने त्याला प्राण गमवावा लागला. या संतापजनक घटनेचा भोर तालुका प्राथमिक शिक्षक समिती जाहीर निषेध करीत आहे. तसेच शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने परजिल्हा व परतालुका शिक्षकांना कोविड- 19 खबरदारी साठी आपत्कालीन सर्वेक्षणाचे नाकाबंदी चे काम देण्यात आलेले आहेत. ते काम सर्वजण प्रामाणिकपणे करीत आहेत अशा शिक्षकांना कुटुंब जवळ नसल्याने तसेच खानावळ/मेस या कालावधीत बंद असल्याने अशा शिक्षकांची आबळ होत आहे. तरी सद्य परिस्थिती नुसार अशा शिक्षकांना आपल्या गावी उन्हाळी सुट्टीस जाण्यासाठी परवानगी मिळावी. सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
भोर तालुका प्राथमिक शिक्षक समितीने हे निवेदन प्रांत भोर ,तहसीलदार भोर व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांना दिलेले आहे.
शिक्षक समितीचे नेते संजय पवार म्हणाले की, शिक्षकांना दिलेल्या नाकाबंदी कामातून मुक्त करणेबाबत प्रांत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असे आश्वासन दिले आहे की, शिक्षकांना या कामातून लवकरच मुक्त करणार आहे.
निवेदन देताना शिक्षक समितीचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, शिक्षक नेते संजय पवार, शिक्षक समितीचे सरचिटणीस सुरेश खोपडे, सहचिटणीस शरद पवार ,शिक्षक समितीचे प्रवक्ते रवींद्र थोपटे आदी उपस्थित होते.