(साखर ता.वेल्हे: फ्लू क्लिनिकचे उद्घाटन करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार शिवाजीराव शिंदे , डॉक्टर व ग्रामस्थ.)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■___________________________________
कापूरहोळ (प्रतिनिधी):-----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यपणे सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी वेल्हे तालुक्यात मेंगाई मंदीर वेल्हे बुद्रूक, साखर व पानशेत येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा तीन ठिकाणी 'फ्लू क्लिनिक' सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी दिली.
या तीनही 'फ्लू क्लिनिक' केंद्रावर स्थानिक खाजगी डॉक्टर नागरिकांच्या सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी १० ते ११:३० या वेळेत विनामूल्य सेवा बजावणार आहेत. या फ्लू क्लिनिकमध्ये केवळ सर्दी, ताप व खोकला याच आजारांवर उपचार केले जाणार आहेत. या व्यतिरिक्त इतर आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी होणार नसल्याचे स्पष्ट करून सर्दी, ताप व खोकला ही लक्षणे असलेल्या नागरिकांना या विनामूल्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार शिंदे यांनी केले आहे.
वेल्हे तालुक्यात पानशेत परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सर्दी, ताप व खोकला ही लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सेवेचा लाभ घेऊन आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. त्यासाठी फ्लू क्लिनिकला येताना नागरिकांना संचारबंदीचे उल्लंघन न होऊ देता सोशल डिस्टन्स, मास्कचा व सॕनिटायजरचा वापर याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची सूचना शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, मेंगाई मंदिर वेल्हे येथे डॉ. जितेंद्र जाधव व डॉ. नलिनी जाधव या दांपत्यांनी आपले दिवंगत वडील डॉ. हरिभाऊ जाधव यांच्या रुग्णसेवेची व्रत परंपरा अबाधित ठेवत कर्तव्य बजावत आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार शिवाजीराव शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी पुढाकार घेतला असून संबंधित अधिकारी व विनामूल्य सेवा देणारे कार्यरत डॉक्टर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
