धान्य वितरणावर प्राथमिक शिक्षक ठेवतात काटेकोरपणे लक्ष.......
कापूरहोळ (प्रतिनिधी):--विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी पुणे जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली आहे. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य दरात होणे आवश्यक आहे. दरम्यान रास्तभाव दुकानांमध्ये अन्नधान्याचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाची नेमणूक केलेली आहे.
त्यानुसार भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील प्राथमिक शिक्षक स्वस्त धान्य दुकानातून केशरी शिधा पत्रिका धारकांना धान्य वाटप करताना नियंत्रक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी 24 मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्र लॉक डाऊन केलेला आहे. त्या अनुषंगाने केशरी शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून 2020 करिता सवलतीच्या दराने अन्नधान्य देणे, तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना निर्धारित दराने धान्य पुरवठा करणे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटप करणे, अशा विविध योजना घोषित केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
त्यानुसार भोर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप सुरू केले आहे. स्वस्त धान्य दुकानावर सनियंत्रण असावे आणि वाटप सुरळीत व्हावे, यासाठी देखरेख ठेवणे कामी जिल्हा पुरवठा अधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केलेली असून शिक्षक प्रामाणिक पद्धतीने काम करीत आहेत.
धान्य वितरण होतांना गैरप्रकार होऊ नये यासाठी रास्त भाव दुकानदार यांना सूचना देण्यात आल्या. धान्य वितरण याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याने रास्तभाव दुकानातील धान्य वितरणावर प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे वितरण गतीने व सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहिती भोरचे प्रांत राजेंद्र जाधव यांनी दिली.
"महाराष्ट्र वार्ताशी" बोलताना 'तहसीलदार अजित पाटील' म्हणाले की,
रास्त भाव दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंचा योग्यरीत्या पुरवठा व्हावा त्यात कुठल्याच प्रकारे गैरव्यवहार होऊ नये .यासाठी दक्षता बाळगण्यात येत आहे. धान्य वितरण नियंत्रणाची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आलेली आहे .