(महामानव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर).
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ:----(-प्रतिनिधी):---विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भारत देशाच्या या पवित्र भूमीवर अनेक वीरांचा- महापुरुषांचा जन्म झाला. ज्यांच्या हृदयात मानवतेच्या ठोक्याचे आवाज ऐकता येतात, ज्या महामानवाने या पृथ्वीतलावर पूर्ण मानवतेसाठी जन्म खर्ची घातला, ते युगपुरुष भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय .यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला. या महामानवाला जयंतीनिमित्त ही शब्द मानवंदना.
हजारो वर्षांपासून निशब्द असणाऱ्या व धर्मसंस्कृतीच्या साखळदंडानी बंदिस्त असणाऱ्या मुकनायकाला त्यांनी 'मूकनायक'(३१ जानेवारी १९२०)या वृत्तपत्रातून वाचा प्राप्त करून दिली ,यास आता शंभर वर्षे पूर्ण झाली.
मुकनायकातून अशिक्षित,वंचित,कमकुवत घटकास त्यांनी नायक बनविले."शिका,संघटीत व्हा आणि संघर्ष करा" हे बाबासाहेबांनी तळमळीने पटवून दिले.बाबासाहेबांनी विचारस्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना खूप महत्व दिले.समाजाच्या मुक्तीसाठी, उद्धारासाठी ते चंदनाप्रमाणे झिजले.गौतम बुद्धांच्या विचारांचा, तत्वांचा प्रभाव डॉ.बाबासाहेब यांचेवर होता. त्यांनी धर्मांतराची घोषणा केल्याप्रमाणे १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.'डॉ.आंबेडकरांचा 'सांगाती'या पुस्तकाचे लेखक बळवंत हणमंतराव वराळे(मुळगाव बेनाडी ता. चिकोडी जि .बेळगांव) यांना १९२२ ते १९५३ एवढ्या प्रदीर्घ कालावधीत बाबासाहेबां सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सहवास लाभला. ते या पुस्तकात लिहितात 'समाजकारण,राजकारण,अर्थकारण, धर्मकारण यामध्ये सखोल आणि परिपूर्ण अभ्यास करून पारंगतता मिळवणारी व्यक्ती भारतात बाबासाहेबांसारखी दुसरी झालेली नाही. असे आपल्या देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासावरून सहज लक्षात येईल'.छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी' मुंबई मुक्कामी बाबासाहेबांच्या घरी जाऊन स्वतः भेट घेतली .बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
बाबासाहेब म्हणतात "छत्रपती शिवरायांचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर होता, म्हणूनच मी भारत देशाची राज्यघटना लिहू शकलो ." असा क्रांतिसूर्य ६ डिसेंबर १९५६ रोजी हे जग सोडून गेला. कोट्यवधी जनता शोकसागरात बुडाली .धगधगता निखारा शांत झाला. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात बाबासाहेबांनी स्पर्श केला नाही. परिवर्तनाचे अग्रदूत,उत्कृष्ठ संसदपटू, प्रख्यात ग्रंथकार,या महामानवाला घडविणारे धन्य ते पिता रामजी सकपाळ, जन्मदाती भिमाई. आईच्या मायेनं सांभाळणारी आत्या मीराबाई. बाबासाहेबाना प्रत्येक कार्यात साथ देणारी रमाई.आज 14 एप्रिल 2020 रोजी जयंती निमित्त महामानवाचे विचार आत्मसात करून ते कृतीत आणू. समस्त मानवाच्या उन्नतीसाठी कार्य करून बाबासाहेबांचे अपुरे स्वप्न पूर्ण करू .या महामानवाला कोटी कोटी प्रणाम.
=================================
लेखन,शब्दांकन--
रावसाहेब बंडा शितोळे सर.
पदवीधर शिक्षक
जि.प.शाळा उंबरे ता.भोर
जि. पुणे.
मो. नं.9284503291.
विठ्ठल पवार.
पत्रकार.
पुणे .
मो. नं.९२२६८००७८३
®®®©©®®®®®®®®℃®®®®®®®®®®
