पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांत रंगणार, बाळगोपाळांची पंगत.

Maharashtra varta
(पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांत रंगणार बाळगोपाळांची पंगत.खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून दर बुधवारी उपक्रम ,भोर तालुक्यातून झाला प्रारंभ.)
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
कापूरहोळ, (प्रतिनिधी) - विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना सकस आणि पौष्टिक अन्न मिळावे या उद्देशाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून भोर तालुक्यातील भोंगवली गावात 'बाळगोपाळ पंगत' हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. हीच संकल्पना घेऊन यापुढे पुणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये दर बुधवारी 'बाळगोपाळ पंगत' आयोजिण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक बालक सुदृढ आणि निरोगी असायलाच हवे. समाजातल्या प्रत्येक घटकातील मुलांना पोटभर सकस आणि पौष्टिक अन्न मिळायला हवे. शिवाय शाळेत जाताना त्या मुलाने आंनद आणि उत्साहात जायला हवे. त्यासाठी बालक आणि त्यांच्या पालकांनी तसेच समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घ्यायला हवा, ही बाब लक्षात घेऊन सुप्रिया सुळे यांनी आवाहन करून ही संकल्पना मांडली.  त्याला सकारात्मक प्रतिसाद देत भोंगवली गावच्या नागरिकांनी अल्पावधीतच निधी उभा केला आणि बुधवारी (दि. २७) या गावातील अंगणवाडीमध्ये पहिली वहिली बाळगोपाळ पंगत पार पडली.

कुपोषणाच्या विरोधात लढा देण्यासाठी सुळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमास समस्त भोंगवली गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. इतकेच नाही, तर अंगणवाडीमध्ये मोठ्या कौतुकाने आणि आनंदाने पंगतीत बसून जेवत असलेल्या त्या चिमुकल्या बालकांना पाहण्यासाठी उभा गाव जमा झाला होता. मुलांच्या पालकांनीही अत्यंत उपयुक्त अशा या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. ही संकल्पना कायम राबवायला हवी, अशी भूमिका गावच्या प्रतिष्ठित मंडळींनी लागलीच बोलून दाखवली.

या आवाहनाला प्रतिसाद देत दर बुधवारी हा उपक्रम घेण्याचा निर्णय झाला. इतकेच नाही तर भोंगवलीसह पुणे जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्यांमध्ये दर बुधवारी त्या त्या गावातील गावकऱ्यांच्या  सहकार्याने 'बाळगोपाळ पंगत' उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●○●●●●●●●●●●●●●●●●
To Top