(वाई, सातारच्या प्रसिध्द उदयोन्मुख साहित्यिक सौ. छाया जावळे.)
----------------------------------------------
पुणे( प्रतिनिधी):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
27 फेब्रुवारीला मातृभाषा दिन साजरा केला जातो.एखादा दिवस साजरा करणे खूप सोपं होत चालंय.पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करतोय का? किंवा करायला हवेत तर कोणते? सांगतोय, स्वरूप भारतात ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’ अर्थात किमान समान कार्यक्रम ही संकल्पना सर्वपरिचित आहे. सरकार कोणतीही योजना आखत असते, वेळी एक दिशादशर्क म्हणून या संकल्पनेचा उपयोग होतो. आर्थिकदृष्टय़ा मागास, शोषित-वंचित अशा घटकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळावे अशी या कार्यक्रमामागील भूमिका असते. पण आपलेच संवेदनशून्य होत जाणारे मन सध्या हे जणू विसरत चालले आहे की, आपली भाषा- आपली मातृभाषा ही सुद्धा जागतिक भाषेच्या रेटय़ासमोर-सोशल मीडिया, प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. या मातृभाषेची जाण व ज्ञान येऊन आपण सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान जागता ठेऊन मराठी भाषा संवर्धन व जतन करावे,हा आशयपूर्ण विचार व संदेश "अभिमान मराठीचा" या कवितेतून सांगत आहे, वाई, सातारच्या प्रसिध्द उदयोन्मुख साहित्यिक सौ. छाया जावळे.
"अभिमान मराठीचा "
मनामनात कणाकणात
मराठीचा वास आहे.
इथे प्रत्येक ह्रदयात,
मराठीचा ध्यास आहे...
स्पंदनात नसानसात
संचार मराठीचा आहे.
मनगटी कर्तृत्वात
हूंकार मराठीचा आहे...
इतिहासाच्या पानात
मर्म मराठीचे आहे.
रणांगणात शौर्याचे
तेज मराठीचे आहे...
भाषेच्या शृंगारात
साज मराठीचा आहे.
उपमा अलंकारांचा,
बाज मराठीचा आहे...
आप्तांच्या आपुलकीचा
साद मराठीत आहे
मैत्रीत प्राण देण्याचा
नाद मराठीचा आहे..
जय शिवाजी गर्जनेत
रक्त मराठीचे आहे.
समृद्ध महाराष्ट्राचा
अभिमान मराठी आहे
