(शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन बदली धोरणात कोणता बदल असावा व कशाचा समावेश असावा या बाबत सविस्तर चर्चा करताना)
----------------------------------------
पुणे (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे बदलीचे धोरण ठरवताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाला विश्वासात घेऊनच नवीन बदली धोरण जाहीर केले जाईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळास दिला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी "महाराष्ट्र वार्ताच्या" प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे नविन धोरण ठरवण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य असलेला अभ्यासगट निर्माण केला आहे .या अभ्यासगटाने दि.१० फेब्रुवारी रोजी पुणे येथे शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिका-यांची बैठक घेऊन मते जाणुन घेतली .त्याच धरतीवर राज्यात विभागीय स्तरावर बैठकीचे आयोजन करुन त्या ठिकाणी शिक्षक संघटनेचे जिल्हास्तरीय पदाधिकारी, आमदार, जिल्हा परिषदचे पदाधिकारी व पालक यांची मते जाणुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या अभ्यासगटाचा अहवाल येण्यापुर्वी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दि.१८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन बदली धोरणात कोणता बदल असावा व कशाचा समावेश असावा या बाबत चर्चा करण्यात आली.या चर्चेच्या वेळी ना.मुश्रीफ यांनी अभ्यासगटाचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय पदाधिका-यां समवेत चर्चा करुनच नवीन बदलीचे धोरण जाहीर करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
बदली धोरणाबरोबरच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करणे , उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आगाऊ वेतनवाढीचे आदेश देऊन वेतन निश्चिती करणे,वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कँशलेस सुविधा लागु करणे,शिक्षण सेवकाचे मानधन वाढविणे ,आंतरजिल्हा बदली धोरणात आपसी बदलीचा समावेश करणे ,वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवाजेष्टतेसाठी मुळ नेमणुक दिनांक ग्राह्य धरणे ,शिक्षकांना अशैक्षणिक कामातुन मुक्त करणे ,सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करणे ,१००% विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणे या सह अनेक प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली.
या शिष्टमंडळात शिक्षक नेते संभाजीराव थोरात ,प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल,संपर्क प्रमुख मोहन भोसले कार्याध्यक्ष अंबादास वाजे नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप ,बाळासाहेब झावरे, शेख इसाक पटेल , बाबुराव पालकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------
__________________________________________
""""'''''''''''''''''''''''"""'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''""""''''''''''''''''''''''''''''''''''''
