वेल्हे पोलीस ठाण्याचे रूप पालटले.सहायक पोलीस निरीक्षक देवकर यांचा स्तुत्य उपक्रम; पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंट.

Maharashtra varta
( वेल्हे ,पोलीस ठाण्याच्या आवारात पर्यटक व नागरिकांसाठी लावण्यात आलेले फलक.)

"""""""""""""'''""''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''"""""""""""""'"
कापूरहोळ (प्रतिनिधी) :विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

 पोलीस ठाणे म्हटले की ,फक्त कायद्याचा धाक अन् गुन्हेगारांचे आगार अशीच ओळख सध्या सर्वत्र दिसून येते. परंतु वेल्हे पोलीस ठाण्याचे "सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर "यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक तोरणागडाच्या पायथ्याशी असलेले गडाचे प्रवेशद्वार व 'प्रचंडगडा'चे 'तोरण' म्हणून नवी ओळख निर्माण होत असलेल्या वेल्हे पोलीस ठाण्याचे रूप पालटले असून 'स्मार्ट वेल्हे पोलीस ठाणे' पर्यटक व सामान्य नागरिकांचे आकर्षण केंद्र म्हणून  नावारुपास येत आहे.
    

वेल्हे तालुक्यात तोरणा, राजगड यासारखी गडकिल्ले, मढेघाटासारखी प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यांसह देशविदेशातील पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. वेल्हे पोलीस ठाणे हे तोरणागडाच्या मुख्य मार्गावर असल्याने पर्यटक व सामान्य नागरिकांना आपल्या जबाबदारीची व कर्तव्याची जाण व्हावी, तसेच कायद्यासंबंधी व घ्यावयाच्या खबरदारीचे ज्ञान व्हावे या उद्देशाने वेल्हे पोलीस ठाण्याच्या आवारात चित्रयुक्त माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. गडावर चढाई करण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी गडउतार होणाऱ्या पर्यटकांचा थकवा नाहिसा होण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
       
वेल्हे पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेल्या या फलकांवरील माहितीची जणू  पर्यटकांना भुरळ पडली असून पर्यटकांसाठी अभ्यास केंद्राबरोबरच 'सेल्फी पॉईंट' असल्याचे दिसून येत आहे.  या लावलेल्या फलकांवर मुले व महिलांची सुरक्षा, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉस्को) २०१२, मोबाईल फोन टिप्स, मुलांचे अधिकार, बेजबाबदार वाहन चालविण्यास प्रतिबंध, सायबर गुन्हे, बँकिंग फसवणूक, मॉर्फिंग, फिशिंग, सायबर स्टॉकिंग, अॉनलाईन गेमिंग, रिपोर्टिंग पोर्टल, सोशल मिडिया,  लग्नाचे आमिष दाखवून होणारी फसवणूक,  OLX वेबसाईटवर होणारी फसवणूक, राष्ट्रीय व ऐतिहासिक संपत्तीच्या संरक्षणासाठी नागरिकांना आवाहन, राजगड, तोरणा, मढेघाट येथे भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी घ्यावयाच्या खबरदारी या  संबंधीचे आवाहन करण्यात आले आहे.


विनायक देवकर, (सहायक पोलीस निरीक्षक, वेल्हे).
यांनी महाराष्ट्र वार्ताशी बोलताना सांगितले की,
"स्मार्ट पोलीस ठाणे या संकल्पनेतून  नागरिक व पर्यटक यांना सोयी सुविधा पुरवण्यात येत आहे. तसेच लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांमधील नकारात्मकता कमी करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी 'स्मार्ट पोलीस ठाणे' ही संकल्पना महत्त्वाची भूमिका बजावेल." - 
------------------------;---------------------------------------

To Top