(खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वेल्हे तालुक्यास "राजगड" हे नाव देण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राव यांना देताना)
----------------------------
कापूरहोळ( प्रतिनिधी) :
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
वेल्हे तालुक्याचे नामांतर "राजगड तालुका" असे करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या "लोककल्याणकारी कार्याचा'' शासनाने गौरव करावा असे साकडे खासदार सुप्रिया सुळे ,खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शासनाला घातले.
आमदार संग्राम थोपटे यांनीही वेल्ह्याचे नामांतर राजगड तालुका करण्या बाबत महसूल विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी ( दि. 25 ) जिल्हाधिकारी नवलकिशोर राव यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. यावेळी वेल्हे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष रेणुसे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते किरणदादा राऊत,शंकरराव भुरुक ,प्रदीप मरळ, भगवान बांदल ,संदीप खुटवड,नंदकुमार रसाळ ,प्रमोद लोहकरे ,सुधीर रेणुसे यावेळी उपस्थित होते.
शिवरायांनी स्थापन केलेल्या जगातील पहिल्या हिंदवी स्वराज्य या स्वतंत्र लोकशाहीवादी राष्ट्राची पहिली राजधानी असलेला राजगड हा तालुका म्हणून देशाच्या नकाशावर येऊन शिवरायांच्या विश्वंदनिय लोककल्याणकारी कार्याचा गौरव व्हावा यासाठी वेल्हे तालुक्याला "राजगड" नाव देण्यात यावे ,अशी मागणी तालुक्यातील मावळ्यांची अनेक वर्षांपासून आहे.
मावळा जवान संघटनेच्या वतीने वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड तालुका असे करण्यात यावे यासाठी गावो गाव ,वाड्या वस्त्यात जनजागृती अभिमान राबविण्यात आले. त्यामुळे राजगड साठी मोठे जनमत तयार झाले असुन सर्वसामान्य मावळ्यांशेतकऱ्यांपासून तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला आहे. तालुक्यातील 72 ग्रामपंचायती पैकी तब्बल 60 ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वेल्ह्याचे नाव "राजगड तालुका" करावे असे ठराव मंजूर करण्यात आले आहे. मावळा संघटनेने
ग्रामपंचायतीचे ठराव व मागणीचा प्रस्ताव वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी जिल्हाधिकारयांना दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे ,राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सणस , विजय सणस ,अविनाश रांजणे, रोहित नलावडे आदींसह मावळे या साठी पाठपुरावा करत आहेत.
"राजगड" हा जगातील पहिल्या लोकशाहीवादी राष्ट्रातील पहिला तालुका असल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढे आले आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची ,राजगड ही पहिली राजधानी आहे. येथून त्यांनी 25 वर्षे राज्यकारभार पाहिला राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व वीर मावळ्यांचा शौर्य ,विद्वतेचा मोठा ठेवा राजगड व परिसरात आहे.शिवरायांच्या विश्ववंदनीय कार्याच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा यासाठी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांपासून आहे.
"शिवरायांच्या काळा पासून स्वातंत्र्य पूर्व काळा पर्यंत तालुका "राजगड असे उल्लेख असलेल्या नोंदी व शिक्के आहेत."
(इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून राजगड तालुक्याचा उल्लेख आहे. शिवरायांच्या विश्ववंदनीय कार्याचा व वीर मावळ्यांच्या प्रखर स्वराज्यनिष्ठेचा ज्वलंत वारसा राजगडाला आहे. शिवरायांनी परकियांची शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. लोककल्याणकारी राज्य स्थापन करून त्याचा राज्यकारभार राजगडावरून पाहिला. लोककल्याणकारी कार्यासाठी स्थिर प्रशासन यंत्रणा उभी केली. त्यासाठी गाव, कसबा , परगणे, प्रांत, तालुका, विभाग, सुभा अशी रचना केली. स्वराज्याचा कारभार चोखपणे व्हावा यासाठी खेड्या पाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तालुक्याची निर्मिती केली. राजगड हा जगातील पहिला तालुका आहे).
राजगड हा राष्ट्राचा ज्वलंत राष्ट्रीय वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्ववंदनीय कार्याचा अनमोल ठेवा आहे.राजगड तालुका नामकरणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा विश्वंदनिय वारसा पुन्हा जिवंत होणार आहे.)
------------------ ----------------
(शिवकाळात "राजगड तालुका" म्हणून उल्लेख असलेली कागदपत्रे व शिक्के ,कागदपत्रे दाखविताना इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे व शिवभक्त)
--------------------------------------------
