टोलनाका हटाव कृती समिती करणार,१६ फेब्रुवारीला जनआंदोलन ..टोल नाका हटाव कृती समितीचा आक्रमक पवित्रा........

Maharashtra varta






(खेडशिवापूर टोलनाक्यावरील वसुली तातडीने बंद करून टोल पीएमआरडीच्या हद्दी बाहेर हटवावा या मुख्य मागणीचा निर्धार करत १६ फेब्रुवारी जनआंदोलन करण्यासाठी तातडीची बैठक रविवारी शिवापूर येथे संपन्न होत असताना)
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
कापूरहोळ / प्रतिनिधी
(महाराष्ट्र  वार्ता ऑनलाईन)

सर्व पातळ्यांवर लढा देऊनही खेडशिवापूर टोल नाका हटला जात नसल्याने अखेर शिवापूर टोलनाका समिती आक्रमक झाली असून, येत्या १६ फेब्रवारीला जनआंदोलन करून टोलनाका बंद पाडण्याचा निर्धार समितीच्यावतीने करण्यात आला आहे. यामुळे टोलनाका प्रशासनाची पायाखालची वाळू सरकली आहे.

खेडशिवापूर टोलनाक्यावरील वसुली तातडीने बंद करून टोल पीएमआरडीच्या हद्दी बाहेर हटवावा या मुख्य मागणीचा निर्धार करत १६ फेब्रुवारी जनआंदोलन करण्यासाठी तातडीची बैठक रविवारी शिवापूर येथे पार पडली. यावेळी समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, दिलीप बाठे, लहूनाना शेलार, पोपट जगताप, डॉ. संजय जगताप, नगरसेवक गणेश जगताप, श्रीरंग चव्हाण, जीवन कोंडे, विलास बोरागे, कृष्णा शिवरकर, महेंद्र साळुंखे, दादासाहेब पवार, गोरख मानकर, प्रवीण महाडिक, मलिक सय्यद, माऊली पांगरे, विकास कोंडे, शहाजी अरसूळ आदी उपस्थित होते.

शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने मागील काही महिन्यापासून प्रशासनाबरोबर चर्चा, बैठका करून टोल नाका हटवासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकाऱ्यांनीही या बाबत महामार्ग प्राधिकरणाला टोल नाका बंद करण्याबाबत कार्यवाही करावी, असे पत्र पाठवले आहे. महामार्गाच्या सुरक्षा अहवालात देखिल हा रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने टोल अकारणी करु नये, असे नमुद आहे. यावरुनच टोल कृती समितीने चार दिवसाची मुदत देवुन टोल बंद करण्याची मागणी मागील आठवड्यात केली होती. त्यास प्राधिकरणाने काहीच उत्तर न दिल्याने आज शिवापुर येथे बैठक घेवुन येत्या १६ फेब्रवारीला भोर, वेल्हा, पुरंदर, शिरवळ येथील नागरिक टोलनाक्यावर ऊतरून जनआंदोलन करण्याचा निर्णय समितीने सर्वानुमते घेतला.

टोल हटवणे हीच कृती समितीची प्रमुख मागणी असुन प्रामुख्याने टोलवसुली बंद करून तातडीने हा बेकायदेशीर टोल पीएमआरडीए च्या हद्दीच्या बाहेर हलवावा. त्याबाबत आता कोणतेही तडजोड केली जाणार नाही अशी भुमीका समिती निंमत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांनी यावेळी स्पष्ट केली.

असे उभारणार जनआंदोलन…

खेडशिवापूर टोलनाका कायमचा बंद पाडण्यासाठी भोर, वेल्हा, पुरंदर व शिरवळ येथील नागरिक टोलनाक्यावर येण्यासाठी समिती गावोगावी प्रबोधन आणि प्रचार करतील. यामध्ये टोल बाबतची भुमिका नागरीकांना पटवुन त्यांना जनआंदोलनात सहभागी कारण्यासाठी प्रवृत्त करतील.

आता फक्त निर्णय हवा.......

खेड शिवापूर टोलनाका बंद पाडण्यासाठी जनआंदोलन करणार असून, जिल्हाधिकारी आणि संबधीत प्रशासनाबरोबर आता कोणतीही चर्चा अथवा बैठका होणार नाही. टोलनाका बंदचा निर्णय घ्यावा; अन्यथा कितीही गुन्हे दाखल केले तरी नियोजित जनआंदोलन होणारच आहे. या मध्ये सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिलीप बाठे यांनी केले.
-------------------------------------------------------------------
To Top