(तेलवडी ता. भोर येथे गणेश जयंतीनिमित्त श्री.गणेशाच्या प्रतिमेची मिरवणूक बैल गाडीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने काढून "गणपती बाप्पा मोरया'',"मंगलमूर्ती मोरया" असा उदघोष गणेश भक्तांनी करत गावात चौका चौकात मिरवणूक काढत भक्तिभाव जोपासला.)
(छाया ....कुमार धावले.)
-----------------------------------------------------------------
कापूरहोळ( प्रतिनिधी ):-विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
माघी गणेश जयंतीनिमित्त तेलवडी ता.भोर येथे( 28 जानेवारी रोजी) तेलेश्वर गणपती मंदिरांमध्ये विविध धार्मिक उपक्रम, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
तेलवडी पंचक्रोशीतील नागरिक, महिला ,विद्यार्थी चाकरमाने यांनी गणेशाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.तेलवडी गावच्या गणेश जयंतीचे 9 वे वर्ष आहे.मोठ्या नेक मनाने, एक दिलाने गणेश जयंती साजरी करण्यात आली.
माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून गावालगत असलेल्या गणपती मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.गावात स्वच्छता करत मंदिरा लगतचा परिसर स्वच्छ करत सामाजिक स्वच्छता महत्वाची हा सामाजिक संदेश तेलवडी करांनी दिला. सकाळी 9 ते 10 या वेळेत श्रींचा अभिषेक, पूजा व प्रसाद वाटप करण्यात आला. हनुमान तरुण मंडळ तेलवडी व तेलवडी ग्रामस्थ यांच्या तर्फे गणेश प्रतिमा पूजन करण्यात आले. सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान श्री.गणेशाच्या प्रतिमेची मिरवणूक बैल गाडीच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने काढून "गणपती बाप्पा मोरया'',"मंगलमूर्ती मोरया" असा उदघोष गणेश भक्तांनी करत गावात चौका चौकात मिरवणूक काढत भक्तिभाव जोपासला. सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान श्री गणेश महा आरती घेण्यात आली. या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.
गणेश मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बाप्पांच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आलेली दिसून आली.
