शिक्षकांचा "राम" हरपला:राम टापरे गुरुजी यांचे अकस्मात निधन.

Maharashtra varta
भोर (प्रतिनिधी):विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाइन),
आपल्या निसर्गदत्त बावनकशी आचार, विचार ,आणि उच्चाराने व परमपूज्य साने गुरुजी,शेवडे गुरूजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन,ज्ञानसागरात विहंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगल्भ गुणवंत ज्ञान  देऊन समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि त्याचबरोबर बुद्धीप्रामाण्यवादाची कास धरून  समाजामध्ये एक नवी प्रतिभावंत जागृती करणारा, आदर्श शिक्षक, आदर्श सामाजिक ,सांस्कृतिक कार्यकर्ता "रामदास हनुमंत टापरे सर" (वय 42)(रा.टापरे वाडी ता. भोर, जिल्हा पुणे)यांचे दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी अकस्मात निधन झालं. 
त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक वैचारिक सृष्टीतला एक लखलखता कसदार नाणे असलेला आदर्श शिक्षक ज्ञानसूर्य तारा अंतर्धान पावला.शिक्षकांचा राम हरपला. अशी भावना प्रत्येक शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून व्यक्त होत होती.गेल्या एकोणीस वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात  शिक्षक म्हणून  समृद्ध काम केलं. रामदास टापरे हे हाडामासाचा अतिशय विरळ शिक्षक व्यक्तिमत्व होतं. आयुष्यभर सच्चेपणा जगणारा माणूस होता. एक प्रभावशाली शिक्षक होता.त्यांच्याकडे खोटं नावाची गोष्ट नव्हती .जगायचं तर तर्क निष्ठेने ,  कुठली गोष्ट तावून-सुलाखून विश्लेषण करूनच ते जगले. त्यांनी माणसाचे महत्त्व खूप मानलं. सर्वांना सामावून घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांची शिक्षक व्यक्तिरेखाही तेवढ्यात जोमात, राम टापरे हे नावच सर्वाना  सामावून घेणार होत 
विद्यार्थ्यांच्या जीवनात नवं भावविश्व निर्माण करणारे ते होते. भोर तालुक्यात आदर्श व गुणिजन शिक्षक यामध्ये राम टापरे यांचं नाव प्रभावी होत. शाळेचं,काम अथवा गावच, मित्राचं अथवा आपल्या जन्मभूमी गावच्या(टापरेवाडीत)प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभाग असणारे व कल्पकतेने काम करणारे रामदास टापरे हे गुरुजी होते. नायगाव ता. भोर येथे 13 वर्षेहून अधिक काळ शिक्षक म्हणून सुरुवातीला काम पाहिलं.देगाव, नसरापूर व सध्या वरवे ता .भोर या विविध गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर्जेदार पद्धतीने19 वर्षेहून अधिक काळ प्रामाणिक व सचोटीने काम केलं.त्यांनी राबविलेले सहशालेय उपक्रम  व वार्षिक स्नेहसंमेलन त्यांच्या कामाची ओळख करून द्यायची. त्यांचे उपक्रम पाहण्यासाठी भोर तालुक्यातील शिक्षक  व अधिकारी, पदाधिकारी त्यांच्या शाळेला आवर्जून भेट देत होते.त्यातून प्रेरणा मिळत  होती.त्यांनी केलेल्या सर्व अध्ययन अध्यापन भूमिकांमध्ये एक विचारांची वेगळी बैठक होती. 
त्यांच अध्यापन सर्व समावेशक व विद्यार्थी घडवणार  होत.त्यातील बरेच विद्यार्थी काही  अधिकारी आहेत तर काही   समाज क्षेत्रात चांगलं काम करत आहेत.ते ज्यावेळी बोलत असायचे , त्यामागे एक विचार होता . प्राथमिक शिक्षकांच्या चळवळीत  व भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत आपल्या कामाची छाप पाडणारा शिक्षक नेता होता.एक निसर्ग सौंदर्य टिपणारा दुर्गभ्रमंती करणारा ,चांगलं नेतृत्व ,कर्तृत्व, वक्तृत्व असलेला बाणेदार शिक्षक  होता.त्यांनी केलेले आदर्शवत कामांची ,व्यक्तिमत्वाची छाप शिक्षक बंधू भगिनींच्या डोक्यातून,व  स्मरणातून जाऊ शकत नाही.

ज्ञान प्रकाशात दिसलेले राम टापरे गुरुजी हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं . विद्यार्थी ,समाज, नागरिक शिक्षक,अधिकारी, पदाधिकारी यांचे आदर्श गुरुजी होते.त्यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. रामदास टापरे गुरुजी आपल्यात नाहीत ,यावर विश्वासच बसत नाही, ही कल्पना मनाला असह्य करणारी आहे.भोर तालुक्याचे खूप मोठ शैक्षणिक नुकसान झाले आहे. समस्त शिक्षक परिवारावर व टापरे परिवार व टापरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. 

."महाराष्ट्र वार्ताच्या वतीने" व तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या व समस्त भोरकर यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली,श्रद्धांजली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
To Top