भोर(प्रतिनिधी):
"माणूस अंगवळणी पडलेल्या वाटांनीच जाणे पसंत करतो. काही व्यक्ती मात्र प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात, समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून देतात. क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कार्य हे अक्षरज्ञान नसणाऱ्या,अज्ञानात खितपत पडलेल्या, गुलामीत पिचत पडलेल्या स्त्रियांना न्याय मिळवून देणार होत." हे सामाजिक क्रांतीच व्रत न डगमगता चालविताना पेलविताना या माऊलीला प्रत्येक क्षणी दुःखाच्या अश्रूबरोबर भाकरीचा घास पोटात ढकलावा लागत असे.
अशी ही क्रांतिज्योत म्हणजेच सावित्रीबाई फुले.यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे झाला. खंडोजी नेवसे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या.वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. यावेळी ज्योतिबांचे वय होते, अवघे तेरा वर्षे. ज्योतिबाच्या विचारसरणीतून ,त्यांनी केलेल्या प्रबोधनातून सावित्रीबाईंच्या जाणिवा जागृत आणि प्रगल्भ झाल्या.समाजात घडणाऱ्या सर्व घटनांचे त्या आता विश्लेषण करू लागल्या. ज्योतिराव सावित्रीबाईंच्या प्रत्येक प्रश्नांचे ,शंकेचे समाधानकारक उत्तर देत त्यातूनच सावित्रीबाईंची सामाजिक जाण परिपक्व होत गेली .
दलित, पीडित दिन दुबळ्या समाजबांधवांच्या सर्वांगीण मुक्तीसाठी आपले सारे जीवन बलिदान करण्याची घोषणा या दांपत्याने केली.या लढाईत उतरल्यानंतर पहिली तोफ शिक्षणक्षेत्राच्या मैदानावर उडविली शूद्रांतिशूद्रांचे अज्ञान घालविण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी संपविण्यासाठी सन १८४८ साली पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा काढून सामाजिक क्रांतीचे पाहिले पाऊलं टाकले .यासाठी दगडगोट्यांचा मार खाल्ला .तसेच प्रसंगी शेणही सावित्रीबाईंच्या अंगावर फेकले गेले.हा त्रास विरोधाला न डगमगता सहन केला.सावित्रीबाईचे कार्य हे चतुरस्त्र होते .स्त्रीशिक्षण, गृहिणीची सूतकताई योजना,एक प्रतिभावंत कवियत्री अशा अनेक क्षेत्रांत त्या अग्रेसर राहिल्या.शिक्षणासाठी जागे व्हा या कवितेत सावित्रीबाई म्हणतात ,
"उठा बंधूंनो, अति क्षुद्रानो जागे होऊनी उठा ,
परंपरेची गुलामगिरी ही तोडण्यासाठी उठा .
बंधूंनो शिकण्यासाठी उठा.
गेले-मेले मनुपेशवे आंग्लई आली"
बंदी मनूची विद्याघेण्या होती ती उठली"...
निद्रित समाजाला त्यांनी शिक्षण देऊन डोळसपणे विचार करण्याची, गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली .जोतिबांच्या निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाज चळवळीची धुरा वाहिली .१८९७ साली प्लेगच्या साथीत रोग्यांची सेवाशुश्रूषा केली. दत्तकपुत्र डॉ.यशवंताने प्लेगच्या रोग्यांना तपासून औषधे दिली. अशावेळी माता सवित्रीबाई या सर्व दगदगीने खुपच थकल्या होत्या, तापाने फणफणल्या होत्या. डॉ. यशवंताने आईला तपासून औषध दिले, पण हा थकला भागला देह वयाच्या अडूसष्ठाव्या वर्षी १० मार्च१८९७ साली मृत्यूच्या अधीन झाला. अखेरच्या श्वासापर्यंत ही माऊली लढली. आद्यशिक्षिका, स्त्रीमुक्तीच्या आद्यप्रणेत्या, विद्येची देवता म्हणून प्रसिद्ध पावलेल्या ज्ञानज्योती काळाच्या पडद्याआड गेल्या.
या थोर क्रांतीज्योतिस माझे त्रिवार वंदन.
-------------------------------------------------------------------
प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंबरे. केंद्र -कामथडी. ता. भोर. जिल्हा -पुणे.
मो. नं.9284503291)
------------------------------------------------------------------
