"राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारे 33 अभ्यासगट रद्द: आमदार कपिल पाटील

Maharashtra varta
पुणे (प्रतिनिधी) विठ्ठल पवार.
राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढणारे  33 अभ्यासगट रद्द करण्याचे आश्वासन आमदार  कपिल पाटील यांना विधानपरिषदेत महाराष्ट्र राज्याचे  शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
दि. 4 डिसेंबर 2019 रोजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी एक पत्राद्वारे 33 अभ्यासगटांची  नियुक्ती केली होती. या अभ्यासगटात शिक्षकांना पगार देण्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान (व्हाउचर सिस्टम) देणे, शाळांची संख्या कमी करणे, शाळांच्या विकासासाठी सीएसआर फंड उभा करणे, मुख्याध्यापकांची पदे सरळ सेवेने भरणे अशा शिक्षण क्षेत्राला मारक विषयांचा समावेश होता. 
या संदर्भात  आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषद नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. आमदार कपिल पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दि. 4 डिसेंबर 2019 रोजी   शिक्षण आयुक्त यांनी स्थापन केलेले 33 अभ्यासगट रद्द करण्यात येत आहेत, असे स्पष्ट आश्वासन दिले.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे तमाम महाराष्ट्र राज्यातील  शिक्षकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
To Top