“मूल्यवर्धन प्रशिक्षण हा केवळ कार्यक्रम नसून शिक्षण व्यवस्थेचा आत्मा आहे. शिक्षकांच्या हातात समाजाचे भविष्य आहे, आणि हे प्रशिक्षण म्हणजे त्या भविष्याला दिशा देणारे सामर्थ्य आहे,” असे विचार भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी मांडले.
नसरापूर येथे झालेल्या मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, श्री शिवाजी विद्यालय जुनियर कॉलेजचे पर्यवेक्षक संदीप हिंगाने, केंद्र प्रमुख प्रतिभा दळवी आणि तज्ञ मार्गदर्शक लता वाघोले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे निवेदन अनिरुद्ध पालकर सर यांनी प्रभावीपणे केले. भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे
या प्रसंगी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी सचिन लोखंडे म्हणाले की, “शिक्षकांमध्ये मूल्य आहेत; राष्ट्राचे हित शिक्षकांवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातून समाजपरिवर्तनाची चळवळ शिक्षकच उभी करतात. भोर तालुक्यात ‘निपुण’चा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत.”
कार्यक्रमात उपस्थित तज्ञ मार्गदर्शकांचा खास सत्कार करून त्यांचे योगदान गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व सकारात्मक ऊर्जेत पार पडला.
“भोर तालुक्यातील शिक्षकांची क्षमता विलक्षण आहे. ‘निपुण भारत’ उपक्रमात आपण केवळ सहभागी न राहता इतरांसाठी आदर्श बनू शकतो. प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. शिक्षकांनी तंत्रज्ञान, अध्यापन पद्धती आणि मूल्यशिक्षण या तिन्ही क्षेत्रांत स्वतःला अद्ययावत ठेवणे आजच्या काळाची गरज आहे.”गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी शिक्षकांना प्रेरित करत सांगितले की, “प्रशिक्षण हे केवळ कर्तव्य नाही—ते शिक्षकांसाठी आत्मविकासाचा सोहळा आहे. भोर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून निपुणच्या ध्येयात आपण अग्रस्थानी राहूया.”

