पुणे : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि., अनंतनगर, निगडे यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास शासनाने मंजुरी दिली आहे. यासोबतच, कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राजगड सहकारी साखर कारखान्याला कार्यक्षमतेने कामकाज सुरू ठेवता येणार असून शेतकऱ्यांच्या ऊस गाळप हंगामाला स्थैर्य मिळणार आहे. शासन हमीमुळे कारखान्याचा विश्वासार्हपणा आणखी दृढ झाला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
भोर, वेल्हा व आसपासच्या भागातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आनंदित झाले आहेत. खेळत्या भांडवलाच्या उपलब्धतेमुळे ऊस दर अदा करणे, वेतन व दैनंदिन खर्च भागविणे सुलभ होईल.
मंत्रिमंडळाचा हा निर्णय सहकार क्षेत्रासाठी दिलासा देणारा ठरत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

